BSBD accounts : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 'बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट' खात्यांसाठी मोठे आणि महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. ही खाती सामान्यतः 'झीरो-बॅलन्स अकाउंट' म्हणून ओळखली जातात आणि लहान बचत व कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी ती तयार करण्यात आली आहेत. नवीन बदलांमुळे या खात्यांमध्ये आता अधिक सुविधा आणि सुलभ प्रवेश मिळणार आहे, ज्यामुळे लहान बचतधारकांनाही मोठ्या खात्यांसारखीच सोय उपलब्ध होईल.
BSBD खात्यांसाठी 'या' नवीन सुविधा
- ठेवीवर मर्यादा नाही : आता BSBD खात्यांमध्ये अनलिमिटेड डिपॉझिट्स (कितीही रक्कम जमा करण्याची सुविधा) करता येईल.
- ATM/डेबिट कार्ड शुल्क नाही : ATM किंवा डेबिट कार्ड वापरण्यावर कोणतेही इश्यू किंवा रिन्यूअल शुल्क लागणार नाही.
- चेकबुक सुविधा : ग्राहकांना वर्षातून किमान २५ पानांची चेकबुक उपलब्ध करून देणे बंधनकारक असेल.
- डिजिटल सेवा अनिवार्य : इंटरनेट आणि मोबाइल बँकिंगची सुविधा देणेही बँकांना अनिवार्य असेल.
- पासबुक/स्टेटमेंट : पासबुक किंवा मासिक स्टेटमेंट यापैकी एक पर्याय ग्राहकांना मिळेल.
पैसे काढणे आणि डिजिटल पेमेंटवर मोठा दिलासा
- फ्री विथड्रॉल्स : दर महिन्याला ग्राहकांना किमान चार फ्री विथड्रॉल्स (पैसे काढण्याची मोफत सुविधा) मिळतील, मग ते स्वतःच्या बँकेच्या ATM मधून असोत किंवा इंटर-बँक ATM मधून.
- डिजिटल पेमेंट वेगळे: सर्वात मोठा दिलासा म्हणजे, UPI, IMPS, NEFT, RTGS सारखे डिजिटल पेमेंट*हे 'पैसे काढणे' मानले जाणार नाहीत. याचा अर्थ ग्राहक महिन्याच्या मर्यादेशिवाय हवे तेवढे ऑनलाइन व्यवहार करू शकतात.
जुने ग्राहक आणि सामान्य खातेधारकांवर परिणाम
जे लोक आधीपासून BSBD खाती वापरत आहेत, त्यांना या नवीन सुविधा खात्यात जोडण्यासाठी बँकेला विनंती करता येईल.
जर एखाद्या व्यक्तीकडे सामान्य बचत खाते असेल आणि त्याला ते BSBD खात्यात बदलायचे असेल, तर ते शक्य आहे. मात्र, अट अशी आहे की, त्या व्यक्तीचे दुसऱ्या कोणत्याही बँकेत BSBD खाते नसावे.
वाचा - टाटा समूहावर शोककळा! 'लॅक्मे' आणि 'वेस्टसाइड'च्या संस्थापिका सिमोन टाटा यांचे ९५व्या वर्षी निधन
कधीपासून लागू होणार नियम?
हे सर्व बदल १ एप्रिल २०२६ पासून लागू होतील. मात्र, RBI ने बँकांना हे नवीन फ्रेमवर्क त्यापूर्वीही लागू करण्याची परवानगी दिली आहे.
RBI चा हा निर्णय लहान बचत खातेधारकांना अधिक सुविधा आणि ताकद देण्यासाठी आहे. आता BSBD खाती केवळ 'बेसिक' न राहता, डिजिटल आणि भौतिक अशा दोन्ही सुविधांनी सुसज्ज असतील.
