RBI Repo Rate Cut: जर सर्व काही नियोजितप्रमाणे पार पडलं, तर फेब्रुवारी महिन्यात तुमच्या कर्जाचा हप्ता (EMI) कमी होऊ शकतो. रिझर्व्ह बँक ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आपल्या आगामी पतधोरण समितीच्या बैठकीत रेपो दरात ०.२५ टक्क्यांपर्यंत कपात करण्याची शक्यता आहे. परकीय ब्रोकरेज 'बँक ऑफ अमेरिका'च्या अर्थशास्त्रज्ञांनी व्यक्त केलेल्या मतानुसार, महागाईचा दर अनुकूल असल्यानं आरबीआय व्याजदरात कपातीचं पाऊल उचलू शकतं.
व्याजदर ५.२५ टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता
रिपोर्टनुसार, आरबीआय रेपो रेट कमी करून तो ५.२५ टक्क्यांपर्यंत आणू शकते. ब्रोकरेजचं म्हणणं आहे की, जर आरबीआयनं दरात कपात केली, तर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात लिक्विडिटी उपलब्ध करून दिली जाऊ शकते. याशिवाय, व्याजदर कपातीचा फायदा प्रत्यक्ष अर्थव्यवस्थेपर्यंत पोहोचवण्यासाठी रोकड उपलब्धतेबाबत दीर्घकालीन स्पष्टता दिली जाण्याची शक्यता आहे.
०%,०%,०%,०% ईयू सोबतच्या डीलमध्ये भारताला का चांगले वाटताहेत हे शून्य; कसे ठरणारेत गेम चेंजर?
आरबीआय सरकारी सिक्युरिटीज खरेदी करणार
बँकांमधील रोख रकमेचा ओघ वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँक एक लाख कोटी रुपयांच्या सरकारी सिक्युरिटीजची (Government Securities) खरेदी करणार आहे. आरबीआयनं जाहीर केलंय की, २९ जानेवारी आणि ५ फेब्रुवारी रोजी प्रत्येकी ५०,००० कोटी रुपयांच्या दोन हप्त्यांमध्ये ही 'ओपन मार्केट ऑपरेशन्स' लिलाव प्रक्रिया पार पडेल. याआधी हा लिलाव ५ आणि १२ फेब्रुवारी रोजी होणार होता, मात्र आता तो आधी घेण्यात येणार आहे.
१० अब्ज डॉलरचा स्वॅप लिलाव
एका स्वतंत्र निवेदनात केंद्रीय बँकेनं माहिती दिली की, ४ फेब्रुवारी रोजी तीन वर्षांच्या कालावधीसाठी १० अब्ज डॉलरचा 'यूएस डॉलर-रुपया खरेदी/विक्री' स्वॅप लिलाव आयोजित केला जाईल. हा लिलाव रिझर्व्ह बँकेच्या सामान्य परकीय चलन व्यवहाराचा भाग असेल. या अंतर्गत, एखादी बँक रिझर्व्ह बँकेला अमेरिकन डॉलर विकेल आणि स्वॅप कालावधी संपल्यानंतर तेवढीच रक्कम परत खरेदी करण्यास संमती देईल.
