Kisan Credit Card : देशभरातील किसान क्रेडिट कार्ड धारकांसाठी मोठी बातमी आहे. ऑपरेटिव्ह किसान क्रेडिट कार्ड (KCC) खात्यातील रक्कम मार्च 2014 मधील ₹4.26 लाख कोटींवरुन, डिसेंबर 2024 मध्ये ₹10.05 लाख कोटी झाली. हे शेतक-यांना कृषी आणि संलग्न कार्यासाठी दिल्या जाणाऱ्या कर्जाच्या रकमेत लक्षणीय वाढ दर्शवते. यातून कृषी क्षेत्रावरील कर्जामध्ये वाढ आणि गैर-संस्थात्मक कर्जावरील अवलंबित्वात घट दिसून येते.
KCC अंतर्गत स्वस्त कर्ज उपलब्ध
किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे एक बँकिंग उत्पादन आहे, जे शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशके यांसारख्या कृषी वस्तू खरेदी करण्यासाठी, तसेच पीक उत्पादन आणि संबंधित कामाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेळेवर आणि परवडणारे कर्ज प्रदान करते. 2019 मध्ये KCC योजना पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय समाविष्ट असलेल्या क्रियाकलापांच्या खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी विस्तारित करण्यात आली.
शेतकऱ्यांना 7 टक्के दराने कर्ज
भारत सरकार सुधारित व्याज अनुदान योजना (MISS) अंतर्गत, वार्षिक 7% सवलतीच्या व्याज दराने KCC द्वारे 3 लाख रुपयांपर्यंत अल्पकालीन कृषी कर्ज प्रदान करण्यासाठी बँकांना 1.5% व्याज सवलत प्रदान करते. कर्जाची वेळेवर परतफेड केल्यावर शेतकऱ्यांना 3% अतिरिक्त त्वरित परतफेड प्रोत्साहन दिले जाते, ज्यामुळे शेतकऱ्यांचा व्याजदर प्रभावीपणे 4% पर्यंत कमी होतो. ₹ 2 लाखांपर्यंतचे कर्ज तारण-मुक्त आधारावर दिले जाते, ज्यामुळे लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना कुठल्याही त्रासाशिवाय कर्ज मिळते.
KCC कर्ज मर्यादा वाढवून 5 लाख रुपये
2025-26 च्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी सुधारित व्याज सवलत योजनेंतर्गत कर्ज मर्यादा ₹ 3 लाख वरून ₹ 5 लाख करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आणखी फायदा होईल. 31.12.2024 पर्यंत सक्रिय KCC अंतर्गत एकूण 10.05 लाख कोटी रुपये देण्यात आले असून, यामुळे 7.72 कोटी शेतकऱ्यांना फायदा झाला आहे.