Jan Dhan Account KYC : लाडकी बहीण, गॅस सबसिडी आणि पीएम किसान सन्मान निधी सारख्या असंख्या योजनांचे पैसे प्रधानमंत्री जन धन बँक खात्यात येतात. जर तुमचे बँक खाते प्रधानमंत्री जन धन योजनेंतर्गत उघडले असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तुम्हाला तुमच्या खात्याचे री-केवायसी करणे अनिवार्य आहे, अन्यथा तुमचे खाते बंद केले जाऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकच्या एका नियमानुसार, १० वर्षे जुन्या सर्व बँक खात्यांसाठी री-केवायसी करणे बंधनकारक आहे.
२०१४ मध्ये सुरू झालेल्या प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत आतापर्यंत देशभरात एकूण ५५.९ कोटी बँक खाती उघडली गेली आहेत. यापैकी सुमारे १० कोटी खात्यांना आता १० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे जर तुमचे खातेही या १० कोटी खात्यांमध्ये समाविष्ट असेल, तर १ ऑक्टोबरपासून ते बंद होऊ नये यासाठी री-केवायसी करून घेणे आवश्यक आहे.
सरकारकडून मोठी मोहीम
सरकार या कामासाठी पंचायत स्तरावर १ जुलैपासूनच केवायसी मोहीम राबवत आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तुम्ही या मोहिमेत सहभागी होऊन तुमचे केवायसी अपडेट करू शकता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत देशभरातील सुमारे १ लाख ग्रामपंचायतींमध्ये यासाठी कॅम्प लावण्यात आले आहेत आणि लाखो लोकांनी आपले खाते अपडेट करून घेतले आहे.
वाचा - GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही? कंपन्यांची 'ही' चलाखी पाहून ग्राहक संतापले
बँक खाते बंद झाल्यास काय होईल?
केवायसी अपडेट न केल्यास बँक तुमचे खाते बंद करू शकते. जर असे झाले, तर तुम्हाला मोठा तोटा होऊ शकतो. तुमचे जन धन खाते बंद झाल्यास, तुम्हाला सरकारकडून मिळणाऱ्या सबसिडीचा (उदा. गॅस सबसिडी) लाभ मिळणार नाही. त्यामुळे, वेळेत केवायसी अपडेट करून तुम्ही ही गैरसोय टाळू शकता आणि सरकारी योजनांचे फायदे मिळवणे सुरू ठेवू शकता.