HDFC Bank: एचडीएफसी बँकेने त्यांच्या बचत आणि सॅलरी खात्यांसाठी नवीन नियम लागू केले आहेत, ज्यामुळे लहान आणि मध्यमवर्गीय ग्राहकांच्या खिशाला फटका बसू शकतो. आतापासून रोख व्यवहारांसाठी म्हणजेच बँकेत रोख रक्कम जमा करणं आणि काढणं यासाठीचं नियम बदलले आहेत. पूर्वी दरमहा २ लाख रुपयांपर्यंतचे रोख व्यवहार मोफत होते, परंतु आता ही मर्यादा १ लाख रुपयांपर्यंत कमी करण्यात आली आहे. याशिवाय, दरमहा फक्त ४ रोख व्यवहार मोफत असतील. जर तुम्ही यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केली किंवा काढली तर प्रत्येक वेळी १५० रुपये शुल्क भरावं लागेल. हे बदल १६ ऑगस्ट २०२५ पासून लागू झाले आहेत.
किती लागणार शुल्क?
जर तुम्ही १ लाख रुपयांपेक्षा जास्त रोख व्यवहार केला तर प्रत्येक १००० रुपयांवर ५ रुपये शुल्क आकारलं जाईल, परंतु किमान १५० रुपये द्यावे लागतील. जर तुम्ही दुसऱ्याच्या खात्यात म्हणजेच थर्ड-पार्टी व्यवहारात पैसे जमा करत असाल तर तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त २५,००० रुपये जमा करू शकता. यापेक्षा जास्त पैसे जमा केले तरी १५० रुपये शुल्क आकारलं जाईल. हे नियम बँकेत वारंवार पैसे जमा करण्यासाठी किंवा काढण्यासाठी जाणाऱ्यांसाठी अडचणीचं कारण बनू शकतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
एचडीएफसीनं रक्कम ट्रान्सफरच्या शुल्कातही बदल केला आहे. जर तुम्ही एनईएफटीद्वारे पैसे पाठवले तर १०,००० रुपयांपर्यंत २ रुपये, १०,००० ते १ लाखांसाठी ४ रुपये, १ लाख ते २ लाखांसाठी १४ रुपये आणि २ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी २४ रुपये शुल्क आकारलं जाईल. आरटीजीएससाठी, तुम्हाला २ लाख ते ५ लाखांसाठी २० रुपये आणि ५ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी ४५ रुपये द्यावे लागतील. आयएमपीएस ट्रान्सफरसाठी, १,००० रुपयांपर्यंत २.५० रुपये, १,००० ते १ लाखांसाठी ५ रुपये आणि १ लाखांपेक्षा जास्त रकमेसाठी १५ रुपये शुल्क आकारलं जाईल.
चेकबुकशी संबंधित नियमांमध्ये बदल
चेकबुकचे नियमही बदलले आहेत. आता बचत खात्यात वर्षातून फक्त १० पानांचं एक चेकबुक मोफत मिळेल, पूर्वी २५ पानांचं चेकबुक मोफत होते. त्यानंतर प्रत्येक अतिरिक्त पानासाठी ४ रुपये द्यावे लागतील. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना काही सूट मिळेल. जर तुम्ही बॅलन्स सर्टिफिकेट, व्याज सर्टिफिकेट किंवा अॅड्रेस कन्फर्मेशन घेतलं तर यासाठी १०० रुपये शुल्क आकारलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी ते ९० रुपये आहे. जुन्या नोंदी किंवा चेकच्या कॉपीसाठी ८० रुपये द्यावे लागतील.
ज्येष्ठ नागरिकांसाठी शुल्क
जर तुमचा चेक कोणत्याही कारणास्तव परत आला, जसे की पुरेशा निधीअभावी, तर पहिल्या वेळी ४५० रुपये, दुसऱ्या वेळी ५०० रुपये आणि तिसऱ्या वेळी ५५० रुपये शुल्क आकारलं जाईल. ज्येष्ठ नागरिकांसाठी हे शुल्क थोडं कमी आहे. तथापि, आयपिन रिजनरेशन आता मोफत करण्यात आलंय आहे, पूर्वी त्याची किंमत ४० रुपये होती.
या नवीन नियमांचा परिणाम त्या ग्राहकांना जास्त होईल जे वारंवार बँकेत येतात आणि रोख व्यवहार करतात. जर तुम्ही देखील एचडीएफसी ग्राहक असाल, तर तुमच्या खर्चाकडे आणि व्यवहाराच्या सवयींकडे लक्ष द्या, जेणेकरून तुम्ही अतिरिक्त शुल्क टाळू शकाल. तुम्ही यूपीआय किंवा नेट बँकिंग सारख्या डिजिटल पेमेंटचा वापर वाढवून हे शुल्क कमी करू शकता.