Credit Card Interest Free Period: तुमच्यापैकी बरेच जण क्रेडिट कार्ड वापरत असतील. अशातच तुम्ही जर काही वस्तू क्रेडिट कार्डाच्या माध्यमातून घेतल्या तर तुम्हाला ती रक्कम भरण्यासाठी काही दिवसांचा कालावघधी मिळतो. हा कालावधी बँकांप्रमाणे निरनिराळा असू शकतो. क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँका आणि इतर वित्तीय संस्थांचा दावा आहे की ते ग्राहकांना ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी देतात. म्हणजेच खर्च केलेल्या रकमेवर तुम्हाला ४५ दिवसांपर्यंत व्याज द्यावं लागणार नाही.
आता अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतो की, जर क्रेडिट कार्डचं बिल दर महिन्याला तयार होत असेल तर ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी कसा?
बिलिंग सायकल समजून घ्या
४५ दिवसांच्या व्याजमुक्त कालावधीसाठी, आपल्याला बिलिंग सायकल समजून घेणं आवश्यक आहे. क्रेडिट कार्डचं बिल जेव्हा-जेव्हा तयार होतं तेव्हा ते ३० दिवसांच्या कालावधीसाठी असतं. बिल भरण्यासाठी आणखी १५ दिवसांचा अतिरिक्त अवधी मिळतो.
४५ दिवस कधी मिळणार नाहीत?
पहिल्याच दिवशी खरेदी केल्यास ४५ दिवसांचा व्याजमुक्त कालावधी उपलब्ध आहे. म्हणजेच जर तुम्ही १ जानेवारीला एखादी वस्तू खरेदी केली असेल तर त्यासाठी पैसे देण्यासाठी तुमच्याकडे ४५ दिवसांचा अवधी असेल.
अशा तऱ्हेनं महिन्याचा दिवस जसजसा वाढत जातो तसतसा बिलं भरण्याचा कालावधी कमी होतो. उदाहरणार्थ, जर आपण ३० जानेवारी रोजी एखादी वस्तू खरेदी केली तर त्यासाठी पैसे देण्यासाठी आपल्याकडे फक्त १५ दिवस असतील.
उदाहरणानं समजून घेऊ
महिन्याच्या १ ते ३० तारखेदरम्यान झालेल्या खर्चाचं बिल पुढील महिन्यात तयार केलं जाईल. जानेवारी महिन्यात क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खर्चाचं बिल फेब्रुवारीमध्ये तयार केलं जाईल.
आता ग्राहकांना ते बिल भरण्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदत देण्यात येणार आहे. म्हणजेच ग्राहकानं १५ फेब्रुवारीपूर्वी बिल भरल्यास त्याला व्याज भरावं लागणार नाही.
हेही समजून घ्या
जर तुम्ही बिल भरण्यास दिलेल्या कालावधीपेक्षा अधिक वेळ घेतला तर तुम्हाला त्यावर व्याज द्यावं लागेल. यावरील व्याजाची गणना अंतिम तारखेप्रमाणे नाही, तर देवाणघेवाणीच्या दिवसनानुसार केलं जातं. यासाठी क्रेडिट कार्डाचं बिल वेळेत भरणं आवश्यक आहे.