फारच कमी लोक असे असतील ज्यांचं बँकेत खातं नसेल. हल्ली जवळजवळ सर्वच लोकांचं बँकेत खातं असतं, ज्यामध्ये ते आपले पैसे जमा करतात किंवा एफडीसारख्या बँक योजनांमध्ये आपले पैसे गुंतवतात. बँकेत जमा झालेले आपले पैसे १०० टक्के सुरक्षित आहेत, असं अनेकांना वाटतं, पण बँकेतील ग्राहकांचे पैसे खरेच १०० टक्के सुरक्षित आहेत का? बँकेशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती फार कमी लोकांना असते. आज आम्ही तुम्हाला बँकेशी संबंधित अशाच काही महत्त्वाच्या गोष्टींबद्दल सांगणार आहोत, ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
बँकेनं डिफॉल्ट केल्यास ग्राहकांच्या पैशांचं काय होतं?
जर बँकेला डिफॉल्टर घोषित केलं तर बँक आपल्या ग्राहकांना फक्त ५ लाखांची गॅरंटी देते. बँकेत ५ लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा असेल तर ती बुडून जाईल. डीआयसीजीसी बँक ठेवींवर केवळ पाच लाख रुपयांची हमी देते.
डीआयसीजीसी म्हणजे काय?
डीआयसीजीसी अर्थात डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही भारतीय रिझर्व्ह बँकेची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे. ही कंपनी देशातील बँकांचा विमा उतरवते. या विम्याचा हप्ता बँकेला भरावा लागतो. बँक डिफॉल्ट झाल्यास डीआयसीजीसीकडून ग्राहकांना पैसे दिले जातात.
कोणत्या बँका ही गॅरंटी देतात?
भारतातील सर्व व्यापारी बँका म्हणजेच परदेशी बँका, ग्रामीण बँका, सहकारी बँका डिफॉल्ट झाल्यास आपल्या ग्राहकांना ५ लाख रुपयांपर्यंतची गॅरंटी देतात. सहकारी संस्था या कक्षेत येत नाहीत. ग्राहकांना मिळालेल्या या ५ लाख रुपयांमध्ये एफडी, आरडी आणि बचत खात्याची रक्कम अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.