Credit Card King : क्रेडिट कार्डचे नाव ऐकताच अनेकांना खरेदी, बिल भरणे आणि महिन्याच्या अखेरीस येणारे भरमसाट कर्ज आठवते. अनेक लोकांसाठी क्रेडिट कार्ड हे एक असे जाळे आहे, ज्यातून बाहेर पडणे कठीण होते. मात्र, दिल्लीतील मनीष धमेजा यांनी हा समज खोटा ठरवला आहे. त्यांच्याकडे एक-दोन नव्हे, तर तब्बल १,६३८ क्रेडिट कार्ड्स आहेत. विशेष म्हणजे त्यांच्यावर एक रुपयाचेही कर्ज नाही!
मनीष धमेजा यांनी आपल्या या अनोख्या छंदाला कमाईचे एक स्मार्ट माध्यम बनवले आहे आणि आपले नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवले आहे.
क्रेडिट कार्ड्सद्वारे कसे कमावतो पैसे?
मनीष धमेजा यांना 'किंग ऑफ क्रेडिट कार्ड्स ॲण्ड कॉईन्स' या नावानेही ओळखले जाते. ही ओळख केवळ कार्ड्सच्या संख्येमुळे नाही, तर त्यांच्या कार्ड वापरण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे मिळाली आहे.
- मनीष यांनी प्रत्येक कार्डचे फायदे आणि अटींचा सखोल अभ्यास केला आहे. कोणत्या कार्डावर सर्वाधिक कॅशबॅक मिळेल, कोणत्या कार्डाने प्रवास केल्यास एअरपोर्ट लाउंजचा मोफत एक्सेस मिळेल आणि हॉटेल बुकिंगवर सर्वात जास्त सूट कशाने मिळेल, हे ते अचूक जाणतात.
- त्यांच्या रणनीतीचा सर्वात महत्त्वाचा भाग आहे 'शून्य कर्ज' हे कठोर अनुशासन. ते कधीही आपल्या पेमेंट क्षमतेपेक्षा जास्त खर्च करत नाहीत आणि नेहमी वेळेवर बिल भरतात. यामुळे ते केवळ व्याजाच्या बोजापासून वाचतात असे नाही, तर त्यांचा क्रेडिट स्कोरही उत्कृष्ट आहे.
कोण आहेत मनीष धमेजा?
मूळचे उत्तर प्रदेशातील लखनऊचे असलेले मनीष धमेजा हे सध्या दिल्लीत राहतात आणि भारत सरकारच्या दूरसंचार विभागात एका जबाबदार पदावर कार्यरत आहेत.
ते केवळ क्रेडिट कार्ड्समुळेच नव्हे, तर त्यांच्याकडे असलेल्या शिक्क्यांच्या विशाल संग्रहामुळेही दुसऱ्यांदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होल्डर ठरले आहेत. त्यांनी बीएससी, एमसीए, एमएसडब्ल्यू, डेटा सायन्समध्ये एमटेक आणि एमबीए अशा अनेक प्रतिष्ठित पदव्या मिळवल्या आहेत. ते डेटा सायंटिस्ट, कलाकार आणि सामाजिक कार्यकर्तेही आहेत.
एवढे कार्ड्स कसे करतात मॅनेज?
इतक्या मोठ्या संख्येने क्रेडिट कार्ड्स सांभाळणे अत्यंत गुंतागुंतीचे आणि क्रेडिट स्कोअरसाठी हानिकारक ठरू शकते. मात्र, मनीष यांच्यासाठी हे अगदी सोपे झाले आहे.
मनीष सांगतात की, ते त्यांची सर्व कार्ड्स सक्रिय ठेवतात, पण त्यांचा वापर खूप विचारपूर्वक आणि गरजेनुसारच करतात. त्यांनी एक अशी खास प्रणाली विकसित केली आहे, ज्यामुळे त्यांना प्रत्येक कार्डची बिलिंग सायकल, ऑफर्स आणि फायदे यावर बारकाईने लक्ष ठेवता येते.
आपल्या यूट्यूब चॅनल आणि सोशल मीडिया हँडलद्वारे ते हजारो लोकांना क्रेडिट कार्डचा योग्य वापर आणि आर्थिक व्यवस्थापनाचे महत्त्वाचे धडे देत आहेत. त्यांनी सिद्ध केले आहे की, क्रेडिट कार्ड कर्ज नव्हे, तर योग्य प्रकारे वापरल्यास कमाईचे आणि बचतीचे उत्कृष्ट साधन ठरू शकते.