credit card : आजकाल क्रेडिट कार्ड वापरणे ही सामान्य बाब झाली आहे. तुम्हालाही कधी ना कधी क्रेडिट कार्डची ऑफर सांगणारे फोन आलेच असतील. अनेकजण गरजेनुसार एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरतात. क्रेडिट कार्डमुळे त्वरित पैसे नसतानाही खरेदी करणे शक्य होते, पण त्याचा योग्य वापर न केल्यास ते कर्जाच्या जाळ्यात ओढू शकते. वेळेवर बिल न भरल्यास मोठा व्याज आणि दंड लागू होऊ शकतो. आज आपण एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड असण्याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत.
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डाचे फायदे
- व्याजमुक्त पैस वापरण्यास मिळतात : साधारणपणे क्रेडिट कार्डावर ४५ दिवसांपर्यंत व्याज लागत नाही. तुमच्याकडे अनेक कार्ड असल्यास, एका कार्डाचे बिल दुसऱ्या कार्डाने भरून तुम्ही हा व्याजमुक्त कालावधी वाढवू शकता. याला 'क्रेडिट रोलओव्हर' म्हणतात.
- विविध ऑफर्स आणि रिवॉर्ड्स: वेगवेगळ्या बँकांच्या कार्डांवर तुम्हाला वेगवेगळे रिवॉर्ड पॉइंट्स, कॅशबॅक आणि खास ऑफर्स मिळतात. यामुळे तुमच्या खरेदीवर बचत होऊ शकते.
- दीर्घकाळ चालणाऱ्या सवलती : काही क्रेडिट कार्ड विशिष्ट वस्तूंवर किंवा सेवांवर दीर्घकाळ सवलत देतात. उदाहरणार्थ, चित्रपट तिकीट किंवा हॉटेल बुकिंगवर सतत सूट मिळत असल्यास ते फायदेशीर ठरू शकते.
अनेक क्रेडिट कार्डाचे तोटे
- वार्षिक शुल्क: प्रत्येक क्रेडिट कार्डसाठी तुम्हाला वार्षिक शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे कार्डांपासून मिळणारे फायदे शुल्कापेक्षा जास्त आहेत का, हे तपासावे लागते.
- आर्थिक जबाबदारी वाढते: जास्त कार्ड असल्याने तुमच्यावर आर्थिक जबाबदारीचा भार वाढतो. तसेच, एकूण क्रेडिट मर्यादा वाढल्याने तुम्ही जास्त खर्च करून कर्जात अडकण्याची शक्यता असते.
- पेमेंटची तारीख विसरण्याची शक्यता: अनेक कार्ड असल्यास त्यांच्या वेगवेगळ्या पेमेंट तारखा लक्षात ठेवणे कठीण होऊ शकते आणि बिल भरायला विसरल्यास दंड लागू होऊ शकतो. त्यामुळे गोष्टी सोप्या ठेवणे अधिक चांगले आहे.
वाचा - टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
क्रेडिट कार्ड वापरताना काय काळजी घ्यावी?
क्रेडिट कार्ड सोयीचे असले तरी, त्याचा वापर जपून करायला हवा. एकापेक्षा जास्त कार्ड असण्याचे काही फायदे असले तरी, त्याचे तोटे अधिक असू शकतात. त्यामुळे गरज आणि आर्थिक नियोजन लक्षात घेऊनच क्रेडिट कार्डांचा वापर करणे योग्य आहे.