Indian Bank Savings Scheme: सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक आपल्या ग्राहकांना एफडीवर उत्तम व्याज देत आहे. इंडियन बँकेत ७ दिवसांपासून ते १० वर्षांपर्यंत एफडी करता येते. ही सरकारी बँक एफडीवर २.८० टक्के ते ७.६५ टक्के व्याज देत आहे. इंडियन बँक ७ दिवसांच्या एफडीवर सर्वात कमी २.८० टक्के व्याज देत आहे. ही बँक ४४४ दिवसांच्या विशेष एफडी स्कीमवर सामान्य नागरिकांना सर्वाधिक ६.९० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७.४० टक्के आणि अति ज्येष्ठ नागरिकांना ७.६५ टक्के व्याज देत आहे. आज आपण इंडियन बँकेच्या अशा एफडी योजनेबद्दल जाणून घेऊ, ज्यामध्ये २ लाख रुपये जमा करून २९,३२५ रुपयांचे निश्चित उत्पन्न मिळवता येऊ शकतं.
२ वर्षांच्या एफडीवर किती व्याज?
सार्वजनिक क्षेत्रातील इंडियन बँक सामान्य नागरिकांना २ वर्षांच्या एफडीवर ६.४० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना ६.९० टक्के व्याज देत आहे. जर तुम्ही इंडियन बँकेच्या २ वर्षांच्या एफडी योजनेत २,००,००० रुपये जमा केले तर सामान्य नागरिकांना मॅच्युरिटीवर एकूण २,२७,०८० रुपये मिळतील. या रकमेत २७,०८० रुपये निश्चित व्याज समाविष्ट आहे. त्याचप्रमाणे, जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल आणि इंडियन बँकेत २ वर्षांच्या एफडीमध्ये २ लाख रुपये जमा केले तर तुम्हाला मॅच्युरिटीवर एकूण २,२९,३२५ रुपये मिळतील, ज्यामध्ये २९,३२५ रुपये निश्चित व्याज समाविष्ट आहे.
मिळतो फिक्स्ड रिटर्न?
शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांच्या वाढत्या लोकप्रियतेमध्ये, एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉझिट अजूनही त्याचं स्थान आणि विश्वास टिकवून आहे. देशातील एक मोठी लोकसंख्या अजूनही एफडीला सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानते. एकीकडे, शेअर बाजार आणि म्युच्युअल फंडांमध्ये प्रचंड जोखीम असते, तर दुसरीकडे, बँक एफडीमध्ये तुम्हाला निश्चित कालावधीत निश्चित व्याजासह मूळ रक्कम मिळते. आरबीआयनं यावर्षी रेपो दरात १.०० टक्के कपात केली आहे, ज्यामुळे सर्व बँकांनी एफडीचे व्याजदरही कमी केले आहेत.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)