Credit Score : आजच्या काळात बँक बॅलन्सप्रमाणेच चांगला क्रेडिट स्कोअर असणेही खूप महत्त्वाचे झाले आहे. काही दिवसांपूर्वी क्रेडिट स्कोअर कमी असल्याने एका तरुणाला नोकरी गमवावी लागली आहे. यावरुन याचं महत्त्व अधोरेखित होतं. क्रेडिट स्कोअरच्या आर्थिक आरोग्याविषयी नुकत्याच आलेल्या 'हाऊ इंडिया चेक क्रेडिट स्कोअर' या अहवालातून अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या आहेत. या अहवालानुसार, देशातील नागरिक आता त्यांच्या क्रेडिट हेल्थबद्दल खूप जागरूक होत आहेत, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये हा कल वेगाने वाढत आहे.
क्रेडिट हेल्थमध्ये दिल्ली अव्वल
पैसाबाजारच्या इनसाइट्स रिपोर्टनुसार, दिल्ली हे देशातील सर्वात 'क्रेडिट-हेल्दी' शहर म्हणून उदयास आले आहे. येथील ४६% सहभागींचा सरासरी क्रेडिट स्कोअर ७४६ होता, जो सर्वाधिक आहे. दिल्लीनंतर पुणे दुसऱ्या स्थानावर असून, येथील ४४% लोकांचा सरासरी स्कोअर ७४४ आहे. या यादीत केरळ आणि चंदीगढ देखील ४३% स्कोअरसह टॉप शहरांमध्ये सामील झाले आहेत.
७१० शहरांचा अभ्यास, लाखो सहभागी
हा अभ्यास खरं तर पैसाबाजारच्या क्रेडिट प्रीमियर लीग या उपक्रमाचा भाग होता. या ऑनलाइन स्पर्धेचा उद्देश देशभरात क्रेडिट स्कोअरच्या महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. ३० दिवस चाललेल्या या स्पर्धेत ७१० शहरांमधून सुमारे ४७ लाख लोकांचा डेटा गोळा करण्यात आला. या स्पर्धेत सर्वाधिक स्कोअर ९०० पैकी ८६१ होता, जो पाच सहभागींनी मिळवला. हे सहभागी बंगळूर, जयपूर, लखनऊ, केरळ आणि पुण्याचे होते. दरम्यान, मुंबई, हैदराबाद आणि लखनऊ ही सर्वाधिक सक्रिय शहरे ठरली, जिथे सुमारे १५ लाख लोकांनी सहभाग घेतला.
वाचा - 'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
महिला आणि तरुणाईचा सहभाग
या स्पर्धेतील आणखी एक रंजक बाब म्हणजे, सहभागी महिलांचे प्रमाण सुमारे ८% होते, त्यापैकी एक तृतीयांश महिला दक्षिण भारतीय शहरांमधून होत्या. तसेच, २९ ते ४४ या वयोगटातील तरुणांनी सर्वाधिक उत्साह दाखवला, आणि एकूण सहभागींपैकी निम्म्याहून अधिक लोक याच वयोगटातील होते. 'घिब्ली-स्टाईल सेल्फी' या खास फीचरमुळे ही स्पर्धा अधिक मजेदार बनली, ज्यामुळे तरुण पिढीमध्ये आर्थिक जागरूकता एका आकर्षक पद्धतीने पोहोचली.