Personal Loan : गेल्या काही वर्षांपासून पर्सनल लोन घेण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. कोणत्याही हमीशिवाय कमी कागदपत्रांत मिळत असल्याने वैयक्तिक कर्ज घेणे लोक पसंत करतात. तुम्हीही वैयक्तिक कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. देशातील अनेक सरकारी आणि खासगी बँका आकर्षक व्याज दरात ही सुविधा देत आहेत. मात्र, तुम्हाला नेमके किती व्याज दरात कर्ज मिळेल, हे तुमचा क्रेडिट स्कोअर, नोकरीची स्थिरता आणि मासिक उत्पन्न यावर अवलंबून असते.
सध्या कोणती बँक सर्वात स्वस्त पर्सनल लोन देत आहे आणि प्रमुख बँकांचे दर काय आहेत, याची माहिती खालीलप्रमाणे:
सर्वात स्वस्त लोन : बँक ऑफ महाराष्ट्र
सध्या पर्सनल लोनच्या दरांमध्ये बँक ऑफ महाराष्ट्र सर्वात आकर्षक ऑफर देत आहे.
व्याज दर: ९.५०% पासून सुरुवात.
मासिक हप्ता : जर तुम्ही ₹५ लाख कर्ज ५ वर्षांसाठी घेतले, तर तुमचा मासिक हप्ता अंदाजे १०,५०१ रुपये होईल.
याशिवाय, पंजाब ॲन्ड सिंध बँक सारख्या इतर सरकारी बँकांमध्ये व्याज दर १०.३५% पासून सुरू होतो, तर प्रक्रिया शुल्क फक्त ०.५०% ते १% पर्यंत असते.
प्रमुख बँकांचे तुलनात्मक दर
देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय आणि इतर प्रमुख खासगी बँकांचे ५ लाख रुपयांच्या कर्जासाठी ५ वर्षांच्या कालावधीसाठीचे दर आणि ईएमआय खालीलप्रमाणे आहेत:
बँक | व्याज दर (अंदाजित सुरुवात) | अंदाजित EMI (₹५ लाख/५ वर्षे) | प्रक्रिया शुल्क |
स्टेट बँक ऑफ इंडिया | १०.३०% | ₹१०,६९७ | कर्जाच्या १.५% पर्यंत |
एचडीएफसी बँक | १०.९०% | ₹१०,८४६ | कमाल ₹६,५०० |
आयसीआयसीआय बँक | १०.८५% | ₹१०,८३४ | कर्जाच्या २% पर्यंत |
एक्सिस बँक | ११.२५% | ₹१०,९३४ | २% पर्यंत |
कोटक महिंद्रा | १०.९९% | ₹१०,८६९ | ५% पर्यंत (सर्वाधिक) |
कर्ज घेण्यापूर्वी काय करावे?
वैयक्तिक कर्ज घेण्यापूर्वी तुम्ही व्याज दर, मासिक हप्ता आणि प्रक्रिया शुल्क यांची तुलना करणे अत्यंत आवश्यक आहे. अगदी लहान व्याज दरातील फरकही दीर्घकाळात तुमची मोठी बचत करू शकतो.
वाचा - ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
लक्षात ठेवा:
- क्रेडिट स्कोअर: ७५० किंवा त्याहून अधिक चांगला क्रेडिट स्कोअर असल्यास तुम्हाला कमी व्याज दरात कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते.
- प्रोसेसिंग शुल्क: काही बँकांचा व्याज दर कमी असला तरी, कोटक महिंद्रा बँकेप्रमाणे त्यांचे प्रक्रिया शुल्क ५% पर्यंत जास्त असू शकते. त्यामुळे केवळ व्याज दर न पाहता, एकूण खर्च तपासा.
- सरकारी बँका: बँक ऑफ इंडिया, पंजाब ॲन्ड सिंध बँक, कॅनरा बँक यांसारख्या सरकारी बँकांचे प्रक्रिया शुल्क कमी असल्याने, एकूण खर्च खासगी बँकांच्या तुलनेत कमी येऊ शकतो.