Canara Bank Loan ROI: जर तुम्ही होम, कार किंवा पर्सनल लोन घेण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. वाढती महागाई आणि बँकिंग क्षेत्रातील बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर कॅनरा बँकेनं आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिलाय. बँकेनं आपल्या व्याजदरात वाढ करण्याची घोषणा केली असून, याचा थेट अर्थ असा की आता तुमच्या कर्जाचा मासिक हप्ता (EMI) वाढणार आहे. हे नवीन दर १२ मार्च पासून लागू झाले असून, यामुळे बँकेच्या लाखो ग्राहकांवर परिणाम होणारे.
MCLR मध्ये १० बेसिस अंकांची वाढ
कॅनरा बँकेनं आपल्या 'मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स बेस्ड लेंडिंग रेट' म्हणजेच MCLR मध्ये १० बेसिस पॉईंट्सची (०.१०%) वाढ केली आहे. MCLR हा असा किमान व्याजदर असतो ज्याच्या आधारावर बँका आपल्या ग्राहकांना कर्ज देतात. जेव्हा यामध्ये वाढ होते, तेव्हा बँकेमार्फत दिली जाणारी जवळपास सर्व प्रकारची कर्ज महाग होतात.
नवीन व्याजदरांचं गणित
बँकेने प्रामुख्यानं दीर्घकालीन कर्ज महाग केले आहे. या बदलानंतरचे नवीन दर खालीलप्रमाणे आहेत:
- २ वर्षांचा MCLR: हा दर पूर्वी ८.८५% होता, जो आता वाढून ८.९५% झाला आहे.
- ३ वर्षांचा MCLR: हा दर ८.९०% वरून वाढवून आता ९.००% करण्यात आलाय.
मात्र, बँकेने अल्प कालावधीच्या (ओव्हरनाईट ते १ वर्षापर्यंत) दरांमध्ये सध्या कोणताही बदल केलेला नाही, ही कमी कालावधीसाठी कर्ज घेणाऱ्यांसाठी काहीशी दिलासादायक बाब आहे.
कोणावर होणार सर्वाधिक परिणाम?
कॅनरा बँकेच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका होम लोन, पर्सनल लोन किंवा बिझनेस लोन घेतलेल्या ग्राहकांना बसणार आहे.
जुने ग्राहक: ज्या ग्राहकांचे कर्ज MCLR शी जोडलेले आहे आणि ज्यांचा 'रिसेट पिरीयड' आता येणार आहे, त्यांच्या ईएमआयमध्ये त्वरित वाढ दिसून येईल.
नवीन ग्राहक: आतापासून कॅनरा बँकेकडून कर्ज घेणाऱ्या नवीन ग्राहकांना पूर्वीच्या तुलनेत अधिक व्याजदराने कर्ज मिळेल.
EMI वर किती वाढणार बोजा?
समजा तुम्ही ५० लाख रुपयांचं होम लोन १५ वर्षांसाठी घेतलं आहे असं समजून. व्याजदरात ०.१०% वाढ झाल्यामुळे तुमच्या मासिक हप्त्यात साधारणपणे ३०० ते ५०० रुपयांपर्यंत वाढ होऊ शकते. ही रक्कम ऐकायला कमी वाटू शकते, परंतु संपूर्ण कर्ज कालावधीचा विचार करता हा हजारो रुपयांचा अतिरिक्त बोजा ठरतो.
