What is UPI Circle : आजकालच्या डिजिटल युगात यूपीआय पेमेंट करणे अगदी सामान्य झाले आहे. भाजीबाजारापासून शेअर मार्केटपर्यंत सर्व आर्थिक व्यवहार यूपीआयच्या माध्यमातून होत आहे. पूर्वी घराबाहेर पडताना लोक पैशांचं पाकीट घ्यायचे. आता मोबाईल घेतला तरी पुरे होतं. पण, अनेकदा आपल्या बँक खात्यातील शिल्लक शून्य होते आणि आपल्याला समजतही नाही. अशावेळी अडचणीत सापडण्याची शक्यता असते. मात्र, हा प्रश्न आता कायमचा संपणार आहे. तुमच्या बँक खात्यात शून्य शिल्लक असतानाही तुम्ही यूपीआयद्वारे पेमेंट करू शकाल. हो, तुम्ही बरोबर वाचलत.
डिजिटल पेमेंट ॲप 'भीम यूपीआय' मधील एका विशेष फीचरमुळे हे शक्य झाले आहे. तुमच्या खात्यात अगदी १ रुपयाही नसताना, तुम्ही कोणालाही पैसे पाठवू शकता. यासाठी तुम्हाला 'यूपीआय सर्कल' या खास सुविधेचा वापर करावा लागेल.
काय आहे 'यूपीआय सर्कल' सुविधा?
यूपीआय सर्कलला 'विश्वासाचा सोबती' असे म्हटले जाते. या सुविधेमुळे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांना किंवा अत्यंत विश्वासू मित्र-मैतर्णींना तुमच्या खात्यातून पेमेंट करण्याची परवानगी देऊ शकता. हे फीचर सक्रिय करताना तुम्ही खालील दोन महत्त्वाचे नियंत्रण ठेवू शकता.
१. पेमेंट मर्यादा: तुम्ही तुमच्या खात्यातून समोरच्या व्यक्तीला किती रुपयांपर्यंत पैसे वापरण्याची मर्यादा आहे, हे ठरवू शकता. जेणेकरून मर्यादेपलीकडील रक्कम वापरली जाणार नाही.
२. मंजुरीचा पर्याय: प्रत्येक यूपीआय व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक आहे की नाही, हा पर्यायही तुम्ही निवडू शकता. एकदा तुम्ही परवानगी दिली की, तुमचा तो विश्वासू मित्र त्याच्या यूपीआय ॲपमधून तुमच्या खात्यातील पैशांचा वापर करून पेमेंट करू शकेल.
'यूपीआय सर्कल' सक्रिय करण्याची सोपी प्रक्रिया
यूपीआय सर्कल फीचर सक्रिय करणे खूप सोपे आहे. खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही हे फीचर सुरू करू शकता.
- ॲप उघडा: सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये BHIM ॲप उघडा.
- लॉगइन करा: तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाचा वापर करून लॉगइन करा.
- फीचर शोधा: होम स्क्रीनवर तुम्हाला 'यूपीआय सर्कल'चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- सदस्य जोडा: आता तुम्हाला ज्या व्यक्तींना पेमेंटची परवानगी द्यायची आहे, त्यांना ॲड करा. यासाठी तुम्ही त्यांचा फोन नंबर, यूपीआय आयडी किंवा क्यूआर कोड स्कॅन करून वापरू शकता.
- मर्यादा सेट करा: समोरची व्यक्ती किती रुपये वापरू शकेल, याची पेमेंट मर्यादा निश्चित करा.
- मंजुरीचा पर्याय निवडा: प्रत्येक व्यवहाराला तुमच्या मंजुरीची आवश्यकता आहे की नाही, हा पर्याय निवडा.
- सबमिट करा: तुमचा यूपीआय पिन टाकून सबमिट बटणावर क्लिक करा.
आता तुमचा विश्वासू मित्र किंवा कुटुंबातील सदस्य कधीही, कोठूनही 'यूपीआय सर्कल'चा वापर करून तुमच्या खात्यातील मर्यादेपर्यंत पैसे हस्तांतरित करू शकतील.