अॅक्सिस बँकेनं आपल्या क्रेडिट कार्डधारकांना मोठा झटका दिला आहे. विविध एअरलाईन्स आणि हॉटेल लॉयल्टी प्रोग्राममध्ये रिवॉर्ड पॉईंट्स ट्रान्सफर करण्याचा उत्तम पर्याय देणारी बँक २० डिसेंबर पासून कोणत्याही ट्रान्सफर पार्टनरला क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स ट्रान्सफर करण्यासाठी क्रेडिट कार्डधारकांकडून १९९ रुपये रिडेम्प्शन फी आकारणार आहे. याशिवाय अॅक्सिस बँकेनं क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक बदलांची घोषणा केली आहे, हे नवे बदल २० डिसेंबरपासून लागू होणार आहेत.
व्याजाच्या शुल्कात वाढ
२० डिसेंबरपासून अॅक्सिस बँकेच्या क्रेडिट कार्डवरील फायनान्स किंवा इंटरेस्ट चार्जेस सध्याच्या ३.६० टक्क्यांवरून ३.७५ टक्क्यांपर्यंत वाढणार आहेत. वार्षिक व्याज शुल्क सध्याच्या ४३.२० टक्क्यांवरून ४५.०० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. व्याजदरातील ही वाढ सर्व क्रेडिट कार्डांना लागू असेल, काही विशिष्ट कार्डवगळता जिथे पूर्वीच्या व्याजदरात कोणताही बदल होणार नाही. थकित बिलाची संपूर्ण रक्कम दर महा देय तारखेपूर्वी किंवा देय तारखेपर्यंत भरण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तुम्हाला जास्त व्याज दर टाळण्यास मदत होईल.
पेमेंट फेल झाल्यास शुल्कात वाढ
अॅक्सिस बँक एसआय, एनएसीएच पेमेंट फेलियर, ऑटो डेबिट रिव्हर्सल किंवा चेक रिटर्नवर शुल्क आकारते. हे शुल्क देयक रकमेच्या २% किंवा कमीत कमी रक्कम ४५० रुपये आहे, याची कमाल मर्यादा १,५०० रुपये आहे. २० डिसेंबरपासून किमान रक्कम ५०० रुपये करण्यात येणार आहे. तसंच १,५०० रुपयांची कमाल मर्यादाही काढून टाकण्यात येणार आहे. हा बदल बरगंडी प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, ऑलिम्पस क्रेडिट कार्ड आणि प्रायमस क्रेडिट कार्ड वगळता सर्व अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर लागू होईल.
शाखेतील कॅश पेमेंट शुल्कात वाढ
क्रेडिट कार्डचे थकीत बिल भरण्यासाठी ऑनलाइन पेमेंट मोडचा वापर करण्याबरोबरच ब्रान्चमध्ये जाऊन पेमेंट करण्याचा पर्यायही उपलब्ध आहे. २० डिसेंबरपासून अॅक्सिस बँक शाखांमध्ये कॅश पेमेंटसाठी १७५ रुपये आकारणार आहे. सध्या हे शुल्क १०० रुपये आहे. तुम्ही एका दिवसात जास्तीत जास्त ५०,००० रुपये कॅश पेमेंट करू शकता. बरगंडी प्रायव्हेट क्रेडिट कार्ड, प्रायमस क्रेडिट कार्ड आणि इन्स्टा इझी क्रेडिट कार्ड वगळता सर्व अॅक्सिस बँक क्रेडिट कार्डवर कॅश पेमेंट चार्जेस लागू असतील.
... तर १०० रुपये अतिरिक्त शुल्क
जर ग्राहकानं पेमेंट केलं नाही किंवा पेमेंट देय तारखेपर्यंत किमान देय रकमेपेक्षा (एमएडी) कमी असेल तर बँक लेट पेमेंट फी (एलपीसी) आकारते.