PNB News: पंजाब नॅशनल बँकेनं (PNB) आपल्या काही विशिष्ट डेबिट कार्ड्ससाठी एटीएममधून रोख रक्कम काढण्याच्या दैनंदिन मर्यादेत ५० टक्क्यांपर्यंत कपात केली आहे. हे नवीन नियम १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार आहेत. रिस्क कंट्रोल मजबूत करणं, ग्राहकांची सुरक्षा वाढवणं आणि सुरक्षित डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देणं या उद्देशानं बँकेनं हे पाऊल उचललं असल्याचं सांगितलं आहे. याचा परिणाम पीएनबीच्या अनेक प्रीमियम आणि स्पेशल डेबिट कार्ड्सवर होणारे.
ज्या कार्ड्सवर आधी दररोज १ लाख रुपयांपर्यंत रोख रक्कम काढता येत होती, ती मर्यादा आता ५० हजार रुपयांपर्यंत खाली येईल. त्याचप्रमाणे, काही हाय-एंड कार्ड्सची मर्यादा १.५ लाख रुपयांवरून ७५ हजार रुपये करण्यात आली आहे. मात्र, इतर सामान्य डेबिट कार्ड्सच्या मर्यादेत कोणताही बदल झालेला नाही. तसेच पीओएस, ई-कॉमर्स आणि कॉन्टॅक्टलेस ट्रान्झॅक्शनच्या मर्यादेतही कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
या कार्ड्सवर होणार परिणाम
बँकेने दोन श्रेणींमध्ये कार्ड्सची विभागणी केलीये :
१. १ लाख रुपयांवरून ५० हजार रुपये मर्यादा होणारी कार्ड्स:
RuPay NCMC प्लॅटिनम डोमेस्टिक डेबिट कार्ड
RuPay NCMC प्लॅटिनम इंटरनॅशनल डेबिट कार्ड
RuPay वुमन पॉवर प्लॅटिनम डेबिट कार्ड
RuPay PNB पलाश डेबिट कार्ड (रिसायकल पीव्हीसी कार्ड)
RuPay बिझनेस प्लॅटिनम NCMC डेबिट कार्ड
मास्टरकार्ड प्लॅटिनम डेबिट कार्ड
व्हिसा गोल्ड डेबिट कार्ड
PNB मास्टरकार्ड प्लॅटिनम राईज
२. १.५ लाख रुपयांवरून ७५ हजार रुपये मर्यादा होणारी कार्ड्स:
RuPay सिलेक्ट डेबिट कार्ड
PNB RuPay सिलेक्ट निओ
PNB RuPay सिलेक्ट एक्सेल
व्हिसा सिग्नेचर डेबिट कार्ड
मास्टरकार्ड बिझनेस डेबिट कार्ड
लिमिट कसं रिसेट करावं?
पीएनबीने ग्राहकांना दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्हाला जास्त लिमिट हवं असेल, तर तुम्ही ते स्वतः सेट किंवा रिसेट करावं लागेल. मात्र, हे नवीन ठरवून दिलेल्या मर्यादेच्या आतच असावं लागेल. यासाठी इंटरनेट बँकिंग, 'पीएनबी वन' मोबाइल अॅप, आयव्हीआर किंवा व्हॉट्सअॅप बँकिंगचा वापर करता येईल.
इंटरनेट बँकिंगद्वारे प्रक्रिया
सर्वात आधी लॉगिन करा आणि 'व्हॅल्यू अॅडेड सर्व्हिसेस' मध्ये 'डेबिट कार्ड पर्सनलायझेशन' निवडा. त्यानंतर खाते क्रमांक आणि सेवा (उदा. एटीएम लिमिट) निवडा. कार्डचे तपशील आणि नवीन लिमिट भरून ओटीपी (OTP) द्वारे कन्फर्म करा.
पीएनबी वन अॅपद्वारे प्रक्रिया
अॅप ओपन करा आणि 'सर्व्हिसेस' मध्ये 'डेबिट कार्ड्स' निवडा. त्यानंतर 'अपडेट एटीएम लिमिट' वर क्लिक करा. खाते आणि कार्ड निवडून नवीन लिमिट टाका आणि ट्रांजेक्शन पासवर्डने कन्फर्म करा. तुमचं लिमिट अपडेट होईल.
