पैशांची गरज असल्यास आता तुम्ही चांदीच्या बदल्यातही बँकेतून कर्ज घेऊ शकणार आहात. भारतीय रिझर्व्ह बँकेनं (RBI) एक मोठा निर्णय घेत सिल्व्हर लोन म्हणजेच चांदीच्या बदल्यात कर्ज घेण्याची परवानगी दिली आहे. आतापर्यंत केवळ सोन्याच्या बदल्यात कर्जाची सुविधा उपलब्ध होती, परंतु आता गरजू लोक त्यांचे चांदीचे दागिने, नाणी किंवा चांदीशी संबंधित इतर वस्तू गहाण ठेवून बँक किंवा गैर-बँकिंग वित्तीय संस्था (NBFCs) कडून कर्ज घेऊ शकतील.
नवे नियम १ एप्रिल, २०२६ पासून प्रभावी होणार आहेत. ग्राहकांना ही सुविधा कॉमर्शियल बँक, अर्बन आणि रूरल को-ऑपरेटिव्ह बँक, एनबीएफसी (NBFCs) आणि हाउसिंग फायनान्स कंपन्यांमार्फत मिळेल.
कोणत्या उत्पादनांवर कर्ज मिळणार नाही?
रिझर्व्ह बँकेनं हे स्पष्ट केलंय की, प्युअर गोल्ड किंवा चांदीच्या विटांवर (Bullion) किंवा त्यांच्या वित्तीय उत्पादनांवर (Financial Products) कर्ज दिलं जाणार नाही. वित्तीय उत्पादनांमध्ये गोल्ड ईटीएफ (Gold ETFs) किंवा म्युच्युअल फंड युनिट्सचा समावेश आहे. रिझर्व्ह बँकेनं ही नवीन सुविधा आरबीआय (गोल्ड ॲण्ड सिल्व्हर लोन) डायरेक्शन्स, २०२५ (Gold and Silver Loan Directions, 2025) नियमांतर्गत सुरू केली आहे. मौल्यवान धातूंच्या कर्ज बाजारामध्ये पारदर्शकता, एकरूपता आणि देखरेख मजबूत करणे हा यामागचा उद्देश आहे.
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
कर्ज फेडल्यावर दागिने परत करणार
रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, जेव्हा कर्ज घेणारा संपूर्ण कर्ज फेडेल, तेव्हा बँकेला ७ दिवसांच्या आत दागिने किंवा चांदी परत करावी लागेल. जर बँकेच्या चुकीमुळे विलंब झाला, तर ग्राहकाला प्रतिदिन ₹ ५,००० (पाच हजार रुपये) या दराने भरपाई द्यावी लागेल.
लिलावाचे नियम
जर ग्राहक वेळेवर कर्ज फेडू शकला नाही, तर बँक त्याची गहाण ठेवलेली चांदी किंवा ज्वेलरीचा लिलाव करू शकते. मात्र, त्यापूर्वी ग्राहकाला नोटीस पाठवून सूचित केले जाईल. लिलावाची रिझर्व्ह प्राइस सध्याच्या बाजार मूल्याच्या ९०% पेक्षा कमी ठेवली जाणार नाही. दोनदा लिलाव अयशस्वी झाल्यास, ती कमी करून ८५% पर्यंत केली जाऊ शकते. जर एखाद्या ग्राहकाने कर्ज फेडल्यानंतर दोन वर्षे उलटूनही आपले सोनं किंवा चांदी परत घेतली नाही, तर बँक त्याला अनक्लेम्ड घोषित करेल आणि ग्राहक किंवा त्याच्या वारसांशी संपर्क साधण्यासाठी एक विशेष मोहीम राबवेल.
