टाटा समूहाने एअर इंडियाची मालकी घेतल्यानंतर, सेवा काही सुधरल्याचे दिसत नाही, परंतू कंपनीतील जुने आणि विस्कळीत रेकॉर्ड्स आता उजेडात येऊ लागले आहेत. अशीच एक रंजक आणि धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे, ज्यात एअर इंडियाने एक असे विमान विकले, ज्याची मालकी त्यांच्याकडे आहे हे त्यांना १३ वर्षांपर्यंत माहीत नव्हते.
जवळपास ४३ वर्षे जुने असलेले हे विमान बोईंग ७३७-२०० मॉडेलचे मालवाहतूक करणारे विमान होते, जे कोलकाता विमानतळाच्या एका अगदी आतील पार्किंग बेमध्ये २०१२ पासून पडून होते. हे विमान VT-EHH या रजिस्ट्रेशन नंबरने ओळखले जात होते आणि जुन्या काळात ते 'इंडियन एअरलाइन्स'च्या ताफ्यात होते.
विमान 'विसरले' कसे?
एअर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कॅम्पबेल विल्सन यांनी कर्मचाऱ्यांसाठी लिहिलेल्या अंतर्गत पत्रात या असामान्य घटनेची माहिती दिली. हे विमान २००७ मध्ये 'एअर इंडिया' आणि 'इंडियन एअरलाइन्स'च्या विलीनीकरणानंतर 'इंडिया पोस्ट' साठी मालवाहतुकीसाठी वापरले जाणार होते. २०१२ मध्ये ते ग्राउंडेड झाल्यावर, खासगीकरण होण्यापूर्वीच्या काळात ते अनेक अधिकृत दस्तऐवजांमधून वगळले गेले. कालांतराने, ते एअर इंडियाच्या मालमत्ता नोंदीतून आणि कर्मचाऱ्यांच्या आठवणीतून पूर्णपणे बाहेर पडले.
हे विमान अस्तित्वात असल्याची आठवण एअर इंडियाला तेव्हा झाली, जेव्हा कोलकाता विमानतळ प्रशासनाने त्यांना हे पडके विमान तेथून हटवण्यास सांगितले. त्यानंतर टाटा समूहाच्या व्यवस्थापनाने तपासणी करून याची मालकी एअर इंडियाकडेच असल्याची पुष्टी केली आणि गेल्या आठवड्यात ते यशस्वीरित्या विकले देखील. विल्सन यांनी या घटनेला, "कपाटातील एक जुने कोळिष्टक काढण्यासारखे" असल्याचे वर्णन केले आहे.
