अदानी समूहाच्या शेअर्समध्ये आज पुन्हा एकदा घसरण पाहायला मिळत आहे. आज या शेअर्समध्ये १ ते २.५ टक्क्यांची घसरण होण्यामागे एक मोठं कारण आहे. वॉल स्ट्रीट जर्नल या अमेरिकन बिझनेस पेपरमध्ये एक रिपोर्ट प्रसिद्ध झालाय. इराणमधून भारतात एलपीजी आयात केल्याप्रकरणी अमेरिकेचे वकील अदानी समूहाची चौकशी करत असल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलंय. गुजरातच्या मुद्रा बंदरातून इराणी एलपीजी आयात करण्यात आल्याचं यात नमूद करण्यात आलंय.
मात्र, या वृत्तानंतर अदानी समूहाकडूनही स्पष्टीकरणही देण्यात आलंय. सोमवारी २ जून रोजी, अदानी समूहाच्या प्रवक्त्यानं हे वृत्त "निराधार आणि खोडसाळ" असल्याचं म्हटलं. तसंच "अमेरिकन अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची कोणतीही चौकशी केल्याची आम्हाला माहिती नाही," असंही त्यांनी नमूद केलं.
अमेरिका-चीननं साथ दिली, पण पाकनं त्यांचीच फजिती केली; F-16 बनवणाऱ्या कंपनीची वाईट अवस्था झाली
शेअर्सवर दबाव
यानंतर मंगळवारी बाजार उघडताच अदानी समूहाच्या शेअर्समध्ये दबाव निर्माण झाला होता. सुरुवातीच्या व्यवहारात अदानी एंटरप्रायझेसमध्ये २.२ टक्के आणि अदानी पोर्ट्समध्ये २.५ टक्क्यांपर्यंत घसरण झाली. हे दोन्ही शेअर्स निफ्टीच्या सर्वात कमकुवत शेअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहेत. याशिवाय अदानी टोटल गॅस, अदानी पॉवर, अदानी ग्रीन आणि अदानी एनर्जी सोल्युशन्स मध्ये १ ते २ टक्क्यांची घसरण दिसून आली.
काय म्हटलं कंपनीनं?
इराण किंवा इराणच्या शिपिंग कंपनीचा कोणतेही कार्गो आपल्या कोणत्याही बंदरावर हाताळलं जात नाही, असंही अदानी समूहानं सोमवारी स्पष्ट केलं. अशा प्रकारे कंपनीनं कोणत्याही निर्बंधांचं उल्लंघन केलेलं नाही. या धोरणांनुसार अदानी समूह आपल्या कोणत्याही बंदरावर इराणचा कार्गो हाताळत नाही, यात इराणकडून येणारी शिपमेंट किंवा इराणशी संबंधित कोणत्याही जहाजाच्या ऑपरेशनचा समावेश आहे," असं कंपनीनं एक्स्चेंज फायलिंगमध्ये म्हटलंय.
इराणच्या मालकीच्या कोणत्याही जहाजाचं व्यवस्थापन किंवा सुविधा पुरवत नसून कंपनी आपल्या सर्व बंदरांवर हे धोरण अवलंबत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे.
वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टमध्ये काय?
वॉल स्ट्रीट जर्नलनं आपल्या रिपोर्टमध्ये, आखाती आणि गुजरातमधील गौतम अदानीयांच्या मुद्रा बंदरादरम्यान टँकरची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली असल्याचं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय. दरम्यान, बंदीचं उल्लंघन होत असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अदानी समूहाच्या शेअर्सपैकी अदानी पोर्ट्समध्ये या वर्षी सर्वाधिक वाढ दिसून आली. २०२५ मध्ये आतापर्यंत या शेअरमध्ये १६ टक्के वाढ झाली आहे. अदानी टोटल गॅसमध्ये यावर्षी सर्वात मोठी घसरण दिसून आली. २०२५ मध्ये हा शेअर आतापर्यंत ११ टक्क्यांनी घसरला आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)