Active vs Passive Mutual Funds : कोरोना काळापासून शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहेत. पण, आपली कष्टाची कमाई गुंतवणे हा एक महत्त्वाचा निर्णय असतो आणि योग्य गुंतवणूक निवडण्यासाठी योग्य माहिती असणे आवश्यक आहे. आजच्या काळात गुंतवणुकीसाठी दोन लोकप्रिय पर्याय आहेत सक्रियपणे व्यवस्थापित म्युच्युअल फंड आणि निष्क्रियपणे व्यवस्थापित इंडेक्स फंड. दोन्ही सारखेच वाटत असले तरी त्यातील फरक समजून घेणे तुमच्या आर्थिक उद्दिष्टांसाठी महत्त्वाचे आहे.
१. म्युच्युअल फंड म्हणजे काय आणि ते कसे काम करतात?
भारतात म्युच्युअल फंड हे असे गुंतवणूक साधन आहे, जिथे अनेक गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र केले जातात. जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडात गुंतवणूक करता, तेव्हा तुम्ही त्या फंडाचे भागीदार बनता आणि फंडाच्या नफ्यातून मिळणारा हिस्सा तुम्हाला मिळतो. या फंडाचे व्यवस्थापन एक व्यावसायिक फंड व्यवस्थापक करतो. हा व्यवस्थापक तुमचा पैसा शेअर्स, बॉण्ड्स आणि इतर सिक्युरिटीजमध्ये गुंतवतो. जोखीम कमी करून चांगला परतावा मिळवण्यासाठी कधी काय खरेदी किंवा विक्री करायची, याचा निर्णय तो सक्रियपणे घेत असतो.
२. इंडेक्स फंड म्हणजे काय आणि ते सक्रीय फंडांपेक्षा वेगळे कसे?
इंडेक्स फंड हा म्युच्युअल फंडाचाच एक प्रकार आहे, ज्याला 'निष्क्रिय फंड' असेही म्हणतात. इंडेक्स फंडाचा मुख्य उद्देश एखाद्या विशिष्ट बाजार निर्देशांकाच्या जसे की निफ्टी ५० किंवा सेन्सेक्सच्या कामगिरीची तंतोतंत नक्कल करणे हा असतो. हे फंड निर्देशांकात समाविष्ट असलेल्या कंपन्यांमध्ये त्याच प्रमाणात गुंतवणूक करतात, ज्यामुळे त्यांची चाल आणि परतावा निर्देशांकाप्रमाणेच असतो.
सक्रीय फंडांचे लक्ष्य बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवणे असते, तर निष्क्रीय फंडांचा उद्देश फक्त निर्देशांकाची नक्कल करणे असतो. अॅक्टीव फंडांमध्ये फंड व्यवस्थापक सक्रियपणे निर्णय घेतो, तर पॅसिव्ह फंडांमध्ये कोणताही सक्रिय निर्णय घेतला जात नाही. अॅक्टीव फंड त्यांच्या सक्रिय व्यवस्थापनामुळे जास्त खर्चिक असतात (TER साधारणपणे १% ते २%). याउलट, पॅसिव्ह फंड तुलनेने कमी खर्चिक असतात (TER ०.२०% ते ०.५०%). अॅक्टीव फंडांमध्ये व्यवस्थापकाच्या निर्णयामुळे जोखीम थोडी अधिक असते, तर पॅसिव्ह फंडांमध्ये बाजारासारखी कामगिरी मिळत असल्याने जोखीम कमी असते.तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम?
- अॅक्टीव आणि पॅसिव्ह फंडांमधील निवड तुमच्या आर्थिक उद्दिष्टांवर आणि जोखीम घेण्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. जर तुम्हाला बाजारापेक्षा जास्त परतावा हवा असेल आणि तुम्हाला तज्ज्ञ फंड व्यवस्थापकांच्या कौशल्यांवर विश्वास असेल, तर अॅक्टीव फंड्स तुमच्यासाठी योग्य आहेत. पण यात फी थोडी जास्त असते.
- जर तुम्ही पहिल्यांदाच गुंतवणूक करत असाल, तुम्हाला कमी खर्चात गुंतवणूक करायची असेल आणि बाजाराप्रमाणे स्थिर वाढ हवी असेल, तर पॅसिव्ह फंड्स हा एक चांगला आणि सोपा पर्याय आहे.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)
