प्रकट दिन: ‘श्री स्वामी समर्थ’ नेमका अर्थ काय? मंत्र जप कसा करावा? पाहा, नियम अन् पद्धती
By देवेश फडके | Updated: March 20, 2025 11:42 IST2025-03-20T11:36:53+5:302025-03-20T11:42:32+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: श्री स्वामी समर्थ नामाचे सर्वच स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करत असतात. पण याचा नेमका अर्थ काय? स्वामी मंत्रांचा जप करताना कोणती माळ वापरावी? नेमके काय करावे अन् काय करू नये? जाणून घ्या...

प्रकट दिन: ‘श्री स्वामी समर्थ’ नेमका अर्थ काय? मंत्र जप कसा करावा? पाहा, नियम अन् पद्धती
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे केवळ स्वामींचे आश्वासन नाही, तर कालातीत पाठबळ आहे. नामाला कसलीही उपाधी नाही; काळ-वेळ नाही, लहानथोर नाही. कृपा व्हावी, अपेक्षापूर्ती व्हावी या संकल्पाने जरी नामाची सुरूवात झाली तरी हरकत नाही. नाम आपले काम करतेच. नामाच्याच प्रभावाने हळूहळू ते घेतले जाऊ लागते आणि स्वामी नामावर आपले प्रेम कधी जडले ते आपले आपल्यालाच कळत नाही. कारण ही किमया स्वामीच करतात. हा नामाचा प्रभाव आपल्या नकळत आपल्याच अंत:करणावर होतो. कलियुगात नामस्मरणावर अधिक भर देण्यात आला आहे. कोणतेही संत, सत्पुरुष नाम घेण्याचाच आग्रह धरतात, असे दिसते. स्वामींचा जप, स्वामींचे नामस्मरण कसे करावे? नियम आणि योग्य पद्धत जाणून घेऊया...
श्री स्वामी समर्थ असे सर्वच स्वामी भक्त नेहमी नामस्मरण करत असतात. नामाचे महात्म्य अगाध आणि कालतीत असेच आहे. ज्याप्रमाणे ताकातच लोणी लपलेले असते पण त्यासाठी ते सतत घुसळावे लागते. तद्वत् नामातच नामाचे प्रेम दडलेले आहे. सातत्याने आणि भावपूर्ण अंत:करणाने आपण जर नामाचा अभ्यास केला की नामाचे प्रेम आपोआप येते. प्रपंचात जसे अभ्यास, कर्म, कर्तव्य ह्यांना महत्त्व आहे तितकेच महत्त्व परमार्थात नामस्मरणाला आहे. प्रपंच स्वामींचाच म्हणून प्रेमाने करावा म्हणजे तो छान होतो आणि तो करताना तितक्याच प्रेमाने अक्षय-अव्याहत गोड स्वामी नाम घ्यावे. एकदा का आपण स्वामींचे होऊन स्वामी नामात दंग झालो की, नाम आपले काम करतेच करते! त्याच्या प्रभावाच्या सुंदर खुणा अनुभूतीच्या रूपाने आपल्या अंत:करणात उमटतात. स्वामी आपला योगक्षेम तर पहातातच त्याचबरोबर अनेक दुर्धर प्रसंगात, संकटात-दु:खात आपली काळजी घेऊन ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ ह्या आश्वासनाची प्रचिती देतात. आपल्यावर कृपा करतात आणि आपल्याजवळच असल्याची खुणगाठ ‘नामावताराने’ देतात. परंतु, नाम घेताना त्याचा अर्थ जाणून घेऊन केला, तर तो अधिक उपयुक्त आणि श्रेयस्कर ठरतो, असे सांगितले जाते.
श्री स्वामी समर्थ नेमका अर्थ काय?
षडाक्षरी स्वामी नाम ‘श्री स्वामी समर्थ’ हे महाराजांचे नाव नाही, तर ब्रह्मण्डगस्तीय अद्वैत प्रकृती पुरुषात्मक तारक बीज मंत्र आहे. ‘ॐ नमः शिवाय’, ‘दूं दूर्गायै नमः’, हे ज्याप्रकारे षडाक्षरी तारक मंत्र आहेत त्याच प्रमाणे समानार्थी ‘श्री स्वामी समर्थ’ हा सद्गुरु अनुग्रहीत तारक मंत्र आहे. या तारक मंत्राद्वारे आपण आपल्या श्वास श्वसनावर अजपाजप संधान केल्यास महाराजांचे अंतरिक आत्मज्ञान चित्त शुद्धीकरण योगातून सहजच होते. असा अनेकांचा अनुभव आहे. या तारक मंत्राचा मतीतार्थ व्यवस्थित समजून घेऊन त्यायोगे आत्माचरण करण्याचा प्रयत्न केल्यास संबंधित आत्मप्रत्यययोग सर्व साधारण वेळेपेक्षा अधिक लवकर व आधिक प्रभावकारक होत असतो. श्री स्वामी समर्थ या सद्गुरु ब्रह्मवाचक षडाक्षरी तारक बीजमंत्राचा मतीतार्थ असा आहे.
- ‘श्री’ म्हणजे स्वयं श्रीपदाविराजीत सद्गुरु भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज...!
- ‘स्वामी’ शब्दाची फोड स्वाः+मी. यातील स्वाः म्हणजे भस्म करणे अथवा आत्मसमर्पित करणे असा आहे. मी म्हणजे माझे अज्ञान, अहं भाव, रिपु गण व ईच्छ्या...! अर्थात माझा मी पणा स्वाः करा.
- ‘समर्थ’ म्हणजे संसाररुपी भवसागर सहज तारुण येण्यासाठी माझे स्वयंभु शिवत्व जागृत करा...! त्यायोगे 'श्री स्वामी समर्थ' म्हणजे श्रीपदविराजित भगवान दत्तात्रेय स्वामी महाराज माझे मीपण भस्म करुन स्वयंभू शिव तत्व सद्गुरुकृपे अंकित करा.
स्वामी समर्थांचा जप कसा करावा?
स्वामी समर्थांचा जप करण्यासाठी रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ वापरू शकता. “श्री स्वामी समर्थ” किंवा “श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” या मंत्रांचा तुम्ही एका दिवसांत कितीही माळा जप करू शकता. जप करताना तुम्ही तुमच्या मनात किंवा मोठ्याने मंत्र म्हणू शकता. स्वामी हे दत्त अवतार असल्याने कडक शिस्त आणि अनुशासन आवश्यक आहे. स्वामींचे कोणतेही कार्य करताना नियम पाळूनच करावे.
कोणत्याही मंत्रांचा जप करताना माळेचे नियम
जपमाळ हातात घेतल्यावर प्रथम तिला वंदन करावे. माळेचे मणी एकमेकांवर आदळणार नाही याची काळजी घ्यावी. जप करताना कोणत्याही परिस्थितीत मेरूमणी ओलांडून जप करू नये. जप करताना माळ तुटल्यास ते अरिष्ट सूचक असल्यामुळे वरिष्ठ परिहार्य महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. एका व्यक्तीने ठराविक एकच जपमाळ वापरावी. दुसऱ्या व्यक्तीची जपमाळ वापरू नये. जप झाल्यावर जपमाळेला वंदन करावे. माळ नेहमी एखाद्या चांगल्या डबीत ठेवावी, कुठेही अस्ताव्यस्त पडलेली नसावी. एकाने वापरलेली जपमाळ भेटवस्तू म्हणून दुसऱ्याला देऊ नये. माळेचा जप करताना तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे.
शक्यतो किमान १०८ वेळा मंत्र जप करावा
स्वामी समर्थांचा जप किती वेळा करायचा, याचे निश्चित नियम सांगितले नाहीत. परंतु, जप हा पूर्णपणे तुमच्या श्रद्धेवर आणि वेळेवर अवलंबून आहे. तुम्ही दररोज सकाळी आणि संध्याकाळी ११ माळा जपून सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्ही जप करण्याची वेळ आणि माळांची संख्या वाढवू शकता. आजच्या धकाधकीच्या जीवनात वेळेचे गणित जुळवता येतेच असे नाही. त्यामुळे शक्यतो किमान १०८ वेळा मंत्र जप करावा. जप किती करतो, याची संख्या महत्त्वाची नाही. महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्ण एकाग्रतेने आणि भक्तीने जप करावा. मंत्राचा जप करताना भाव आणि समर्पण महत्त्वाचे आहे, हे आवर्जून कायम लक्षात ठेवावे.
जप करताना नेमकी कोणती काळजी घ्यावी?
जपाची माळ स्वच्छ ठेवावी. माळ जमिनीवर पडू देऊ नका. तर्जनी आणि अंगठा यांनी माळ धरू नका. अनामिका आणि अंगठा यांनी माळ धरून जप करावा. जप करताना शांत आणि स्वच्छ ठिकाणी बसावे. आसनावर बसणे उत्तम. डोळे बंद करून किंवा स्वामींच्या फोटोसमोर बसून जप करावा. जप करताना कोणत्या आसनात बसावे याबद्दल अनेक मतभेद आहेत. काही लोक म्हणतात की पद्मासन किंवा सुखासन हे जपासाठी सर्वोत्तम आसने आहेत, तर काही लोक म्हणतात की कोणत्याही आसनात बसून जप करता येतो. जप करताना योग्य आसनात बसणे महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे आपण शांत आणि एकाग्र राहू शकतो.
श्री स्वामी समर्थ हे नाम स्वरुपात नेहमीच आपल्या सोबत असतात आणि कृपा करत असतात. आता त्यांच्या जपामध्ये काही त्रुटी होत असतील किंवा आपल्याकडून माळ जपताना जर थोड्या फार प्रमाणात चुका होत असतील, तर त्या सुधारायला हव्यात. शक्य तितके सगळे नियम पाळून जप करावा. स्वामींच्या मंत्रांचा जप मनापासून करावा. चूक झाली तर नम्रपणे स्वामींची क्षमायाचना करावी. चुका सुधारण्याकडे आणि त्या पुन्हा होऊ नयेत, यावर भर द्यावा. ब्रह्मांडनायक स्वामी समर्थ महाराज पाठीशी नेहमी उभे राहतील.
।। श्री स्वामी समर्थ ।।