प्रकट दिन: प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांचे खरे स्वरुप कसे आहे? अद्भूततेचा अनुभव
By देवेश फडके | Updated: March 26, 2025 07:07 IST2025-03-26T07:07:07+5:302025-03-26T07:07:07+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: स्वामींचे महात्म्य आणि लीला अगाध आहेत. ब्रह्मांडनायक कृपासिंधू स्वामी महाराजांबद्दल कितीही लिहिले, बोलले, वाचले, तरी कमीच आहे.

प्रकट दिन: प्रत्यक्ष दत्तावतार श्री स्वामी समर्थ यांचे खरे स्वरुप कसे आहे? अद्भूततेचा अनुभव
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचेश्री स्वामी समर्थ मानले जातात. दत्तगुरुंचा प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभ, दुसरा अवतार श्री नृसिंह सरस्वती आणि तिसरा अवतार हा स्वामी समर्थ. अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांना एकदा आपण येथे कुठून आलात? असा प्रश्न भाविकांनी विचारला होता. तेव्हा प्रथम आम्ही कर्दलीवनातून हिमालयाकडे निघालो. पुढे फिरत हरिद्वार व केदारेश्वर पाहिले. पुढे स्वामींनी गावांची व तीर्थक्षेत्रांची शेकडो नावे घेतली. पुढे दक्षिणेस हैद्राबादेस गेलो. तेथून मंगळवेढा, पंढरपूर, बेगमपूर, मोहोळ, सोलापूर अशा गावी राहत अक्कलकोटास आलो, असे सांगितल्याचे म्हटले जाते.
प्रत्येकाला स्वामी विविध रुपात, स्वरुपात दिसले. स्वामींनी अनेकांना विविध रुपात दर्शन देऊन प्रत्यक्ष अनुभूति दिली. आपल्याला आयुष्यात काही मिळवायचे असेल तर ती फक्त स्वामीकृपाच! दुसरे काहीच नको, ही एकच भावना अंत:करणात खोलवर रुजवावी. कारण तीच एकमेव शाश्वत सुखाच्या विसाव्याची जागा आहे, अशी अनेक भाविकांची आस्था आहे. स्वामी माऊली म्हणजे साक्षात दत्तमूर्ती! सर्व काही आपल्या भक्तावर प्रेमाने लुटवणारा कृपासिंधूच आहे तो! फक्त आपली अढळ निष्ठा आणि अनन्य प्रेम हवे. प्रारब्धाने कितीही दु:ख संकटे आली तरी भक्तांची भगवंताच्या चरणांवर अढळ श्रद्धा आहे की नाही स्वामी पहातात आणि एकदा का भक्त त्यांच्या परीक्षेला उतरला की स्वामींच्या कृपेला सीमाच राहत नाही.
स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही
स्वामी धि (बुद्धी) पती, श्री (लक्ष्मी) पती, पृथ्वीपती, यक्षपती व देवाधिपती (सर्व देवतांचे देव, सर्व सरकारांचे सरकार) आहेत. त्यांच्यापुढे कोणाचीही सत्ता नाही. स्वामी हे विश्वातील तेज, प्रदीप्तमूर्ती आहेत. ते तेज स्वामींच्या नेत्रातून प्रगट होते, म्हणून स्वामींच्या नजरेला नजर देता येत नाही, असे म्हटले जाते. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अचल, अढळ आणि अखंड आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. स्वामी अद्भुत आहेत. स्वामी स्वयंभू, स्वयंसिद्ध आहेत. ते अव्यक्त आहेत. ते भक्तांसाठी नाम व रूप घेतात. स्वामी ॐकारातील पहिला स्वर 'अ'कार, म्हणजे शेषशायी विष्णू भगवान आहेत. स्वामी अचलोपम म्हणजे उपमा न देता येण्यासारखे, अथांग सामर्थ्य व ज्ञानरूप आहेत. स्वामी अतर्क्य व अनुत्तम आहेत. स्वामी महाराज हे अतिसूक्ष्म व अति विराट आहेत.
स्वामींच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य
स्वामी म्हणतील तेच शेवटी खरे होईल. स्वामी कालांतक आहेत. म्हणजे मायास्वरूप काळशक्तीचा अंत करणारे आहेत. त्यासाठी ते कृतलक्षण म्हणजे सर्वदासिद्ध आहेत. ते कृपासागर आहेत, ते कृतनाश, कृतांत, कृतलक्षण आहेत. स्वामींची कृपा उदंड व त्याच्या मुखातून येणारे श्रीवचन हे अविनाशी त्रिकालबाधित सत्य आहे. स्वामी भावविनिर्गत आहेत, म्हणजेच मोहापासून निर्माण होणाऱ्या ममतेचा स्पर्श स्वामींना नाही. स्वामी चिदंबर व दिगंबर आहेत. चित् आणि दिक् हेच ज्यांचे वस्त्र आहे, असे विराटरूपी ते चिन्मय-चैतन्यरूप आहेत. सर्व कर्मे स्वामीच करतात. (उत्पत्ती, स्थिती, लय) स्वामी कृतागम म्हणजे वेद निर्माण करणारे आहेत व श्रुती (श्रवण), स्मृती (स्मरण) यांनी उपासनेस योग्य अशी विभूती आहेत- 'कथित' आहेत. स्वामी चतुरात्मा आहेत. म्हणजेच ब्रम्हा, विष्णु, महेश व माया अशा चार स्वरुपात वावरणारे-मन चित्त, बुद्धी व अहंकार याद्वारे व्यक्त होणारे नित्य, शुद्ध, मंगल असे सूक्ष्मरूपी चारुलिंग शुद्ध मंगल असे सूक्ष्म कारण आहेत. म्हणून स्वामींनी भक्तांना म्हणून स्वतःचे प्रतीक म्हणून स्वामींनी भक्तांना आत्मलिंग भेट दिले.
स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती, या सर्व विश्वाचे कल्याण
स्वामी त्रिविध तापहर (जन्म, जरा, मरण,- या अवस्थांतील यातना) आणि अधिभौतिक, आधिदैविक आणी आध्यात्मिक ताप हरण करणारे भक्तकाम कल्पद्रुम - भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आणि सर्व संकटापासून वाचवणारे आहेत. या सर्व विश्वाचे कल्याण, मंगल, सुखसमाधान केवळ स्वामी अत्युच्च कोटींची शक्ती आहे. स्वामींचा क्रोध सर्व विश्वाला परवडणारा नाही व म्हणून ते सर्वसामान्य जीवांवर रागवत नाहीत. सर्व विश्वच आपल्या हातात गोटीच्या स्वरुपात धरून ठेवले आहे. तरी कोप झाल्यास सर्व विश्वाचाच संहार होईल म्हणून स्वामी अपराधांना क्षमा करतात. स्वामी अतींद्रिय स्मर्तृगामी म्हणजेच स्मरण करताच, हाक मारताच भक्तासाठी अवतीर्ण होणारा साक्षात ईश्वर आहे. स्वामी 'अहंभावहीनं प्रसन्नात्मभाव' असे आहेत. स्वामी त्रिलोकाश्रय म्हणजेच स्वर्ग, पृथ्वी व पाताळ यांचे आधार व आश्रय आहेत. स्वामी आत्मसंभव आत्मतत्वातून व निजरूप आणि निजानंदातून प्रेरणा किंवा स्फूर्तीरूप व्यक्त होतात.
स्वामी परमेश आहेत, मोक्षप्राप्ती घडवतात
मी सर्व जीवांचे सुहृद आहेत. स्वामी अंतःसाक्षी (प्रत्येकाच्या हृदयात असणारा) व अनंत परमात्मा आहेत. स्वामी अमुख्य आहेत. म्हणजेच होणाऱ्या गोष्टींचे कर्तेपण ते स्वतःकडे घेत नाही. ते निर्मोही, निरहंकारी, तुल्यनिंदा, स्तुतिमोंनी व निर्विकारी 'साक्षी' आहेत. म्हणून ते म्हणायचे "मला नमस्कार करा किंवा करु नका. माझे नामस्मरण, पूजा करा किंवा करू नका, मी आहेच. ते भक्तांवर नित्य प्रसन्न असतात. त्याच्या पापवृत्तीवर व संकटावर ते रागावतात व त्याची देहशुद्धी व चित्तशुद्धी घडवून आणून त्याला मोक्षप्राप्ती घडवतात. स्वामी परमेश आहेत. श्री स्वामी समर्थ कल्याणकारी देवतांचे स्वामी आहेत. ते अखंड व सर्व चराचराला व्यापून आहेत. ते सर्वसाक्षी आहेत. स्वामीच सर्व विश्वातील 'अर्थ', आनंद, प्रेम आणि 'सुख'रूप आहेत. आहेत. स्वामीच सर्व जीवातील प्राण व तेज आहेत. स्वामी नित्य जागृत आहेत. स्वामी निरालंबासनी आहेत. म्हणजे त्यांचे आसन कशाच्याही आधारावर अवलंबून नाही. त्यांचे स्थान चंद्र सूर्य तारे उदायास्तापलीकडेचे आहे. ते सर्व विश्वाला व्यापून दशांगुळे उरलेले आहेत.
- अशा श्री स्वामी समर्थ या नावाचा नामोच्चार केला, तरी एक विश्वास, चैतन्य आणि आनंद मिळतो, असा अनेकांचा अनुभव आहे. दत्तगुरुंचा अवतार असलेले स्वामी समर्थ महाराजांची कोट्यवधी घरांमध्ये नित्यनियमाने पूजा, नामस्मरण केले जाते. अनेक भाविक तसा अनुभव बोलून दाखवतात. हजारो भाविक न चुकता दर गुरुवारी स्वामींचे दर्शन घेतात. कोणी अक्कलकोटला जातो, तर कोणी स्वामी मठात जातो. अनेकविध ठिकाणी स्वामी समर्थ महाराजांचे मठ आहेत. या स्वामींच्या मठात जाऊन हजारो भाविक दर्शन घेतात. ब्रह्मांडनायक कृपासिंधू श्री स्वामी समर्थ महाराजांसमोर नतमस्तक होतात. स्वामी होते, स्वामी आहेत आणि स्वामी राहणारच आहेत.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥