प्रकट दिन: स्वामींच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे? योग्य पद्धत कोणती? पाहा, नियम
By देवेश फडके | Updated: March 23, 2025 07:16 IST2025-03-23T07:16:19+5:302025-03-23T07:16:19+5:30
Shree Swami Samarth Prakat Din 2025: श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून श्रीगुरुलीलामृत ग्रंथाचे सप्ताह किंवा त्रि-दिवसीय पद्धतीने पारायण करायचे असेल, तर तारखा अवश्य लक्षात ठेवा. सविस्तर माहिती जाणून घ्या...

प्रकट दिन: स्वामींच्या गुरुलीलामृत ग्रंथाचे पारायण कसे करावे? योग्य पद्धत कोणती? पाहा, नियम
Shree Swami Samarth Prakat Din 2025: ३१ मार्च २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. तर, २६ एप्रिल २०२५ रोजी स्वामी समर्थ महाराजांचा स्मरण दिन आहे. स्वामी महाराजांच्या लीला अतिशय अगाध आहेत. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून अनेक जण स्वामी समर्थ महाराजांचे स्वामी चरित्र सारामृत किंवा गुरुलीलामृत या अतिशय प्रभावी ग्रंथांचे आवर्जून पठण करतात. सप्ताह पद्धतीने पारायण करतात. गुरुलीलामृत या ग्रथांचे पारायण करायचे असेल, तर त्याची योग्य पद्धत कोणती? गुरुलीलामृत पारायण करण्यासाठी कोणते नियम अवश्य पाळले गेले पाहिजेत? याबाबत सविस्तर जाणून घेऊया...
श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण करायचे आहे? कसे करावे? पाहा, योग्य पद्धत, फलश्रुती
स्वामींची महती सांगावी तेवढी कमीच आहे. स्वामी समर्थ महाराजांच्या संदर्भात अनेक ग्रंथसंपदा, स्तोत्रे, श्लोक, मंत्र असून, भाविक याचा लाभ घेत असतात. श्री गुरुलीलामृत, श्री स्वामी चरित्र सारामृत हे अतिशय प्रभावी ग्रंथ मानले गेले आहेत. याचे नित्यनेमाने पारायण केल्यास तत्काळ फळ मिळू शकते, अशी अनेक भाविकांची श्रद्धाही आहे आणि अनेकांचे तसे अनुभवही आहेत. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी या कालातीत शुभाशिर्वादावर विश्वास असणारे लाखो भाविक स्वामी चरणी लीन होत असतात. दत्तावतारी स्वामी समर्थ महाराज असंख्यांचे श्रद्धास्थान आहेत. स्वामींच्या लीलांचे वर्णन ज्या ग्रंथात आले आहे, तो म्हणजे श्री गुरुलीलामृत. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनाचे औचित्य साधून गुरुलीलामृत ग्रंथाचे सप्ताह किंवा त्रि-दिवसीय पद्धतीने पारायण करायचे असेल, तर तारखा अवश्य लक्षात ठेवा. ३१ मार्च २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे. या दिवशी सप्ताह पारायणाची सांगता व्हायला हवी. म्हणजेच मंगळवार, २५ मार्च २०२५ पासून गुरुलीलामृत ग्रंथ पारायणाची सुरुवात करणे आवश्यक आहे.
श्रीगुरुलीलामृत पारायण करण्याची वेळ आणि पद्धत
श्रीगुरुलीलामृत पारायण शक्यतो सकाळी करावे. सकाळीच, स्नानादि कार्ये झाल्यावर नित्याची देवपूजा करून, भोजनापूर्वी पारायण करावे. वेळ निश्चित करावी. शुद्ध वस्त्रे नेसावी. मस्तकी गंध लावावे. कुलदेवता, इष्टदेवता, गुरुदेव आणि श्री स्वामींचे स्मरण करावे. वडीलधाऱ्यांना वंदन करावे. नमस्कार करावा आणि पारायणाची सुरुवात करावी. श्रीगुरुलीलामृत या पोथीत जसे सांगितले असेल, तसे अध्याय पठणास प्रारंभ करावा. तत्पूर्वी, एक दिवा कायम तेवत ठेवावा. पोथीला अक्षता, फुले वाहावीत. पोथीला धूप, दीप दाखवावा. मनापासून पोथीला नमस्कार करून पारायणास सुरुवात करावी.
प्रकट दिन: स्वामींची नित्य सेवा नेमकी कशी करावी? ५ गोष्टींकडे लक्ष द्या, अद्भूत अनुभूति घ्या
श्रीगुरुलीलामृत पारायण पद्धतीची सुरुवात कशी करावी?
उजव्या तळहातावर पळीभर पाणी घेऊन आपले नाव, तिथी, दिनांक आणि वार यांचा उल्लेख करून आपण कोणत्या इच्छापूर्ततेसाठी किंवा कोणत्या कारणास्तव हे पारायण करीत आहोत, हे स्वामींना सांगून संकल्प करावा. तो उद्देश सफल व्हावा, म्हणून श्रींची प्रार्थना करावी. हे झाल्यावर पळीभर हातात घेतलेले पाणी ताम्हनात सोडावे. निर्माल्य आणि हे पाणी नंतर तुळशीत टाकावे.
श्रीगुरुलीलामृत पारायण करतानाची तयारी कशी करावी?
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना चौरंगावर उत्तम वस्त्र ठेवावे. त्यावर श्री स्वामींची तसबीर आणि मूर्ती ठेवावी. रांगोळी काढावी. समई लावावी. गंध, पुष्प, धूप, दीप आणि नैवेद्य या पंचोपचारांनी श्रींची पूजा करावी. आसनावर बसून श्री स्वामींचे स्मरण करून पोथीला वंदन करावे. त्यातील अर्थ नीट समजून घेऊन शांतपणे वाचन करावे. या समयी श्री स्वामी महाराज आपल्यासमोर साक्षात बसलेले आहेत असा भाव असावा. चित्त प्रसन्न असावे. वाचन झाल्यावर स्वामींना गंध, हळद-कुंकू आणि फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद मनोभावे ग्रहण करावा.
प्रकट दिन: स्वामींचा प्रभावी तारक मंत्र नियमित म्हणता? पण नेमका अर्थ काय? पाहा, कालातीत लाभ
श्रीगुरुलीलामृत सप्ताह व त्रि-दिवसीय पारायण विधी
स्नानोपरांत शुचिर्भूत होऊन श्रीगुरुलीलामृत ग्रंथ वाचनास आरंभ करण्यापूर्वी आराध्य देवता-कुलदेवता तसेच वडीलधार्या मंडळींस वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची व पोथीची पूजा करावी. ग्रंथ पारायण झाल्यावर यथोचित पूजन करावी. सप्ताहासाठी सात दिवस (त्रिदिवसीय पारायणाकरीता तीन दिवस) अखंड दीप तेवत ठेवावा. एकभुक्त राहावे. ब्रह्मचर्य व्रत पाळावे. पारायण सांगतेप्रित्यर्थ यथाशक्ति दान करावे.
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा
श्रीगुरुलीलामृत पारायण करताना वाचन करताना मन एकाग्र ठेवावे. इतर विचारांना दूर ठेवावे. शब्दांचा उच्चार योग्य रीतीने करावा. पारायण करताना भक्तीभावाने वाचन करावे. पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने पारायण करावे. पारायण काळात सदाचाराने राहावे. श्रींचे नामस्मरण करावे. त्यांच्या चरित्र कथांचे आशय लक्षात घेऊन त्यावर चिंतन आणि आत्मपरीक्षण करावे. वरील नियम हे सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. आपण आपल्या परिस्थितीनुसार आणि श्रद्धेनुसार त्यात बदल करू शकता.
श्रीगुरुलीलामृत पारायण केल्यावर नेमका काय लाभ होतो?
श्रीगुरुलीलामृत पारायणामुळे मन शांत, प्रसन्न आणि एकाग्र होते. नकारात्मक विचारांपासून मुक्तता मिळते. सकारात्मक विचारसरणी विकसित होते. भक्ती, श्रद्धा, आत्मविश्वास वाढतो. उन्नतीसाठी अनुकूल वातावरण निर्माण होते. इच्छा पूर्ण होण्यास मदत होते. संकटांवर विजय प्राप्ती आणि जीवनातील अडचणी दूर होतात. कुटुंबात सुख-समृद्धी आणि प्रेमभाव वाढतो. समाधान प्राप्त होते. क्षमाशीलता, सहनशीलता विकसित होते. जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोन विकसित होण्यास मदत होते, असे म्हटले जाते.
प्रकट दिन: ‘श्री स्वामी समर्थ’ नेमका अर्थ काय? मंत्र जप कसा करावा? पाहा, नियम अन् पद्धती
'श्री गुरुलीलामृता'च्या कोणत्या अध्यायात नेमके काय आहे?
'श्री गुरुलीलामृता'च्या पहिल्या 'नमन अध्यायात' विघ्नहर्ता गजानन, प्रकृतिपुरुष, सद्गुरू, सज्जन आणि आई-वडील यांना वंदन केले आहे. दुसऱ्या अध्यायात श्री आनंदभारती महाराजांनी विद्वासांना प्रेरणा दिली आणि 'श्री दत्तजन्म आख्यान' निवेदन केले. तिसऱ्या अध्यायात श्री दत्तगुरूंचा दुसरा अवतार 'श्रीपादवल्लभ' यांचे आख्यान' वर्णिले आहे. चौथ्या अध्यायात 'अंबिकेचे पूर्ण जन्माख्यान व प्रदोषव्रताचा महिमा' सांगितला आहे. पाचव्या अध्यायात 'श्री नृसिंह सरस्वती करंजग्रामी अवतरल्याचे वर्णन' आले असून 'श्री गुरुचरित्र साराची समाप्ती' केली आहे. सहाव्या अध्यायात श्री नृसिंह सरस्वती उत्तर पंथाकडून दक्षिण मंगळवेढ्यास दीनोद्धार करीत असल्याचे वर्णन आले आहे. सातव्या अध्यायात बसाप्पाचे आख्यान सांगितले आहे. आठव्या अध्यायात एका यवनाचा उद्धार सद्गुरूंनी केल्याचे वर्णन आले आहे. सद्गुरू मंगळवेढ्याहून सोलापूरास आले आहेत. नवव्या अध्यायात भक्तांसाठी सद्गुरू अक्कलकोटला आल्याचे वर्ण आहे. दहाव्या अध्यायात ब्रह्मचारी विष्णुबुवांचे गर्वहरण करून त्यांचा उद्धार केला आहे. अकराव्या अध्यायात सद्गुरूंनी अतिथी तृप्त करून स्वतःची क्षुधाशांति केली आहे आणि इतरही लीला दाखविल्या आहेत. बाराव्या अध्यायात रावण्णा या मृत वैश्यास संजीवनी देऊन एका ब्राह्मण स्त्रीच्या मृत बालकासही जिवंत केले, यासंदर्भातील वर्णन आले आहे. तेराव्या अध्यायात एका किमयागाराचे गर्वहरण करून त्याच्यावर सद्गुरूंनी अनुग्रह करून सिद्धी दर्शन भक्तजनांना घडविले आहे. चौदाव्या अध्यायात स्वामींच्या अन्नपूर्णा देवी स्वरुपाने वर्णन आले आहे. पंधराव्या अध्यायात अलंकापुरीच्या नृसिंहयतीस समाधी योग सद्गुरूंनी कथन केला आहे. सोळाव्या अध्यायात सद्गुरूंच्या मुमुक्ष यवनाचा उद्धार, ब्राह्मण बालकास दृष्टिदान व पंडिताचा गर्वहरण ह्या लीला वर्णिल्या आहेत. सतराव्या अध्यायात भक्त जाधवास यमाच्या पाशांतून मुक्त केले आहे आणि जमादारावर अनुग्रह केला आहे. अठराव्या अध्यायात श्री चिदंबर दीक्षित आख्यान वर्णिले आहे. एकोणिसाव्या अध्यायात स्वामींचा परमशिष्य वाळाप्पा त्यांचे वृत्त कथन केले आहे. विसाव्या अध्यायात श्री स्वामीसुत आख्यान सांगितले आहे आणि एकविसाव्या अध्यायात श्री स्वामी समर्थांनी अवतार समाप्ती केल्याचे सांगून ग्रंथ पूर्ण केला आहे.
५ गुरुवार 'या' ५ गोष्टींचे दान करा; स्वामीकृपेने आयुष्यातले अडथळे दूर सारा!
श्रीगुरुलीलामृत सप्ताह पारायण पद्धती
पहिला दिवस: १ ते ३ अध्याय (३८१ ओव्या)
दुसरा दिवस: ४ ते ६ अध्याय (४२९ ओव्या)
तिसरा दिवस: ७ ते १० अध्याय (३५१ ओव्या)
चौथा दिवस: ११ ते १३ अध्याय (३५० ओव्या)
पाचवा दिवस: १४ ते १६ अध्याय (३५३ ओव्या)
सहावा दिवस: १७ ते १९ अध्याय (३१४ ओव्या)
सातवा दिवस: २० व २१ अध्याय (३५८ ओव्या) या प्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत.
स्वामी समर्थ महापर्वणी: स्वामी सेवेची १५० वर्ष, स्वामीसुतांची अखंडित परंपरा, कसा होतो उत्सव?
श्रीगुरुलीलामृत त्रि-दिवसीय पारायण पद्धती
पहिला दिवस: १ ते ७ अध्याय (९०५ ओव्या)
दुसरा दिवस: ८ ते १५ अध्याय (८८३ ओव्या)
तिसरा दिवस: १६ ते २१ अध्याय (७४८ ओव्या) या प्रमाणे प्रत्येक दिवशी अध्याय वाचावेत.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥