Maharashtra Election 2019 ; पाच लाख कुटुंबांना आयोगाची ‘व्होटर गाईड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 06:00 AM2019-10-18T06:00:00+5:302019-10-18T06:00:52+5:30

विधानसभा निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोग आग्रही आहे. त्याअनुषंगाने मतदार जागृतीवर अधिक भर देण्यात येतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये त्याला कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक लहान-सहान बाबीची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे.

Maharashtra Election 2019 ; 'Voter Guide' to five lakh families | Maharashtra Election 2019 ; पाच लाख कुटुंबांना आयोगाची ‘व्होटर गाईड’

Maharashtra Election 2019 ; पाच लाख कुटुंबांना आयोगाची ‘व्होटर गाईड’

googlenewsNext
ठळक मुद्देबीएलओद्वारे वितरण प्रक्रिया : २४.४९ लाख मतदारांना घरपोच ‘फोटो व्होटर स्लिप’, मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज

गजानन मोहोड।
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : मतदान प्रक्रियेची माहिती मतदारांना व्हावी, यासाठी आयोगाद्वारे माहिती पुस्तिका (व्होटर गाइड) तयार करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील किमान २० लाख कुटुंबापर्यंत ही पुस्तिका पोहचविण्यात येत आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांद्वारे पुस्तिका वितरणाची प्रक्रिया सध्या सुरू आहे.
विधानसभा निवडणूक पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, यासाठी आयोग आग्रही आहे. त्याअनुषंगाने मतदार जागृतीवर अधिक भर देण्यात येतो. लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदारांचा प्रत्यक्ष मतदानात सहभाग महत्त्वाचा आहे. यामध्ये त्याला कुठलीही अडचण येऊ नये, यासाठी प्रत्येक लहान-सहान बाबीची माहिती या पुस्तिकेमध्ये देण्यात आलेली आहे. मतदार यादीत नोंद नोंदविण्याच्या प्रक्रियेपासून मत कसे नोंदवाल, याची माहिती देण्यात आलेली आहे. मतदान केंद्रे, मतदान अधिकारी, बोटाला इंक लावणे, इव्हीएम, व्हीव्हीपॅट, मतदान केंद्र कसे शोधाल आदी माहिती या पुस्तिकेद्वारे देण्यात आलेली आहे.
मतदाराला मतदान करणे सुलभ व्हावे, त्याला मतदान केंद्र व मतदार यादीतील क्रमांक शोधण्याची वेळ येऊ नये, यासाठी केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांद्वारे ‘फोटो व्होटर स्लिप’चे वाटप प्रत्येक मतदारांना करण्यात येत आहे. आठही मतदारसंघांतील २४.४९ लाख मतदारांपर्यंत ही चिठ्ठी पोहचविली जात आहे. यामध्ये संबंधित मतदान केंद्र, मतदारांचे छायाचित्र, नाव, वय, पत्ता, सबंधित विधानसभा क्षेत्र, संबंधित मतदार
यादीचा क्रमांक आदी माहिती आहे व मतदानाचे दोन दिवसांपूर्वी या चिठ्ठ्यांचे वाटप होत असल्याने मतदाराला घरबसल्या सर्व माहिती मिळणार आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुरुवारपर्यंत १९ लाख मतदारांपर्यत या फोटो व्होटर स्लिपचे वाटप करण्यात आलेले आहे.
दरम्यान ‘स्वीप’ अभियानांतर्गत जिल्हाभरात मतदार जनजागृतीचे काम जोरात सुरू आहे. शाळा, महाविद्यालयासह गर्दीच्या ठिकाणी जागृती करण्यात येत आहे. याव्यतिरिक्त गावागावांतील चौकाचौकांत मतदार जागृती फलक लावण्यात आलेले आहेत.
मतमोजणीची ठिकाणे निश्चित
मतमोजणीसाठी प्रत्येक मतदारसंघात ठिकाणे निश्चित झालेली आहेत. यामध्ये धामणगाव रेल्वे मतदारसंघात चांदूर रेल्वे येथील शासकीय आयटीआय, बडनेरा व अमरावती मतदारसंघासाठी विलासनगरातील शासकीय धान्य गोदाम, तिवास येथे कृषिउत्पन्न बाजार समितीचे गोदाम, दर्यापूर येथे वैभव मंगल कार्यालय, मेळघाटात धारणी येथे बुलडाणा अर्बन बँकेचे गोदाम, अचलपूर येथे कल्याण मंडपम् तर मोर्शी येथे शासकीय धान्य गोदामात मतमोजणीची प्रक्रिया २४ आॅक्टोबरला सकाळी सात वाजता सुरू होणार आहे. पहिल्यांदा एका टेबलवर एआरओच्या उपस्थितीत टपाली मतपत्रिकांची गणना होईल. नंतर आठ वाजतानंतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे.

मेळघाटातील ३५३ पार्ट्या उद्या होतील रवाना
मेळघाट मतदारसंघातील चिखलदरा व धारणी तालुक्यातील मतदान केंद्रे दुर्गम भागात आहे. मतदान २१ आॅक्टोबरला होत असताना त्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच १९ तारखेला ३५३ पोलिंग पार्ट्या रवाना करण्यात येणार आहेत. यासाठी ४२ एसटी बस व ३४ जीप एवढी वाहने लागणार आहेत. साधारणपणे १३७३ अधिकारी-कर्मचाºयांचा मतदान प्रक्रियेत सहभाग राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर या पार्ट्यांना आवश्यक किट पुरविली जाणार आहे. यामध्ये टॉर्च, बॅटरी, बिस्कीट व आवश्यक वस्तू राहणार आहेत. मेळघाटातील १३३ मतदान केंद्रांवर कनेक्टिव्हिटीची समस्या आहे. त्यामुळे संपर्कासाठी वायरलेस, वॉकी-टॉकी आदी सुविधा देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त रनरदेखील असणार आहे. प्रसंगी वनविभागाच्या वॉकी-टॉकीदेखील वापरल्या जाणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाने दिली.

२६२८ मतदान केंद्रांवर या सुविधा
आठही विधानसभा मतदारसंघांतील २६२८ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत.यामध्ये दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हीलचेअर, आणि स्वयंसेवक, ईव्हीएमवर ब्रेल लिपीची सुविधा, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र रांगेची सुविधा, महिलांद्वारा संचालित १० मतदान केंदे्र, प्रत्येक केंद्रावर मतदार मदत केंद्राची सुविधा, प्रथमोपचार सुविधा, पिण्याचे पाणी व प्रसाधनगृहाची व्यवस्था, दिव्यांग मतदारांना घर ते मतदान केंद्रांपर्यंत ने-आण करण्यासाठी मोफत वाहनांची सुविधा राहणार आहे.

दहा केंद्रे महिलांद्वारे संचालित
धामणगाव रेल्वे मतदारसंघातील चांदूर रेल्वे येथे दोन सखी मतदान केंद्रे, बडनेरा मतदारसंघातील शारदानगर स्थित लाटेबाई शाळेत दोन, अमरावती मतदारसंघातील सेंट थॉमस शाळेत एक, तिवसा मतदारसंघात एक, दर्यापूरमध्ये लढ्ढा नगर परिषद मराठी शाळेत एक, मेळघाट मतदारसंघातील धारणी येथे एक, अचलपूर मतदारसंघातील सुबोध ज्युनियर कॉलेज येथे एक, तर मोर्शी मतदारसंघातील भारतीय महाविद्यालयात एक अशी एकूण दहा सखी मतदान केंदे्र स्थापित करण्यात येणार आहेत.

Web Title: Maharashtra Election 2019 ; 'Voter Guide' to five lakh families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.