Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 06:00 AM2019-10-13T06:00:00+5:302019-10-13T06:00:28+5:30

आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे.

Maharashtra Election 2019 ; A minor mistake should not be made | Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये

Maharashtra Election 2019 ; किरकोळ चूकही घडता कामा नये

Next
ठळक मुद्देचंद्रकुमार यांचे सर्व यंत्रणांना निर्देश : निवडणूक प्रक्रियेत जबाबदारी अचूकपणे पार पाडा

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : लोकसभेपेक्षाही विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर्भांमुळे अधिक संवेदनशील असते. त्यामुळे मतदान केंद्राध्यक्षांसह प्रक्रियेतील सर्व अधिकऱ्यांंनी नियमांचे काटेकोर पालन करावे. किरकोळ चूकही घडता कामा नये, अन्यथा निवडणूक याचिका दाखल होण्याचे प्रसंग उद्भवतात. प्रक्रिया पारदर्शक व भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी जबाबदारी अचूकपणे पार पाडावी, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी शनिवारीे दिले.
निवडणूक आयोगाच्या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी चंद्रभूषण कुमार यांच्यासह अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे, कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलिंद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरली कुमार तसेच विभागीय आयुक्त पीयूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरूपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधीक्षक आदी यावेळी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रियेत चूक आढळल्यास चौकशी प्रक्रिया, दंडाची तरतूद आहे, याची जाणीव सर्व कर्मचाऱ्यांना हवी. त्यामुळे अधिक सुस्पष्ट, अचूक व पारदर्शक काम करावे. मतदान, स्वीप, कायदा व सुव्यवस्था, केलेल्या व करावयाच्या उपाययोजनांबाबत विभागातील सर्व जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुमार यांनी आढावा घेतला.

अतिरिक्त कुमक तयार असावी
आयोगाच्या नियमावलीनुसार सर्व कामे अचूक करण्याच्या सूचना सर्व कर्मचाऱ्यांना द्याव्यात तसेच प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांचे प्रश्न किंवा शंकेचे ताबडतोब निरसन करावे, जेणेकरून प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कुठलाही प्रश्न उद्भणार नाही. संवेदनशील मतदान केंद्रांवर पोलिसांची अधिक कुमक तैनात करण्यात यावी तसेच सर्व प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदारांना मतदान पावती घरपोच मिळेल या दृष्टीने अगोदरच नियोजन करून त्या पोहोचत्या कराव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले.

मतदारांना सुविधा उपलब्ध करा
सेक्टर अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष व मतदान केंद्रांवरील इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येक स्तरावर भरावयाची विवरणपत्रे, मॉक पोल, मतदानाची वेळ संपल्यावर करावयाची कार्यवाही आदीसंदर्भात पूर्णपणे माहिती द्यावी. सर्व शासकीय यंत्रणांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांप्रमाणे सर्व सुविधा मतदारांना उपलब्ध करून द्याव्यात. अधिकाधिक मतदानासाठी प्रत्येक यंत्रणेने जनजागृतीवर भर द्यावा. मतदानाच्या काळात अधिक सजग असावे, असेही कुमार यांनी सांगितले.

चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवा
मतदान केंद्रावर कुठलीही अनुचित घटना घडणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांनी सुसज्ज राहावे. तक्रार प्राप्त झाल्यावर पोलीस प्रशासनाने स्थापन केलेल्या पथकांकडून तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. मतदारांना प्रलोभन किंवा रोख रकमेचे वितरण आदी प्रकारांना आळा घालावा. प्रत्येक चेक पोस्टवर कडक बंदोबस्त ठेवून तपासणी करावी. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील, याची दक्षता घेऊन कठोर कारवाई करावी, असे कायदा व सुव्यवस्था नोडल अधिकारी भारंबे म्हणाले.

Web Title: Maharashtra Election 2019 ; A minor mistake should not be made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.