नगरमधील विशाल गणपती मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 14:26 IST2019-09-02T14:24:41+5:302019-09-02T14:26:35+5:30
विशाल गणपती मंदिरातील विशाल गणेशाच्या मूर्तीसमोरच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.

नगरमधील विशाल गणपती मंदिरात ढोल-ताशांच्या गजरात गणेशाची प्रतिष्ठापना
अहमदनगर : शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री. विशाल गणेश मंदिरात जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. विविध ढोल पथकांनी ग्रामदैवताला सलामी दिली. ढोल ताशांच्या गजरात आणि गणपत्ती बाप्पा मोरयाच्या गजरात बाप्पांचे दिमाखात आगमन झाले.
श्री. विशाल गणपती मंदिरातील विशाल गणेशाच्या मूर्तीसमोरच पार्थिव गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. जिल्हा पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. यावेळी गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर, सचिव पंडित खरपुडे, पोलीस उपाधिक्षक संदीप मिटके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्यासह भाविकांची मोठी गर्दी होती. आरतीच्या वेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली.
यावेळी विविध ढोल पथकांनी वाद्यांचा निनाद केला. तसेच पथकांनी पहिले वादन करून विशाल गणपतीला सलामी दिली. भगव्या रंगातील कुर्ता, फेटा, चंद्रकोरी टिळा अशा पोशाषात ढोल पथकांतील तरुणांनी विविध तालातील प्रात्यक्षिके सादर केली. यावादनाने भाविकांची मने जिंकली.
अकरा दिवसांच्या गणेशोत्सवात विशाल गणपती मंदिरात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी सकाळपासूनच मंदिर परिसरात भाविकांची गर्दी होती. तसेच प्रसाद, पूजाच्या साहित्याची दुकानेही थाटली आहेत. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.