मुंबई : बंगालच्या उपसागरात ऑगस्टच्या मध्यापासून सप्टेंबरपर्यंत लागोपाठ कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. त्याचा प्रवास पश्चिमेकडे झाला.
त्याचा परिणाम म्हणून विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्र व लगतच्या परिसरात मोठा पाऊस झाला आहे. हे असे पहिल्यांदा असे झालेले नाही.
बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली की विदर्भासोबत मराठवाड्यात पाऊस होतो. या घटनेला ग्लोबल वॉर्मिंगसोबत जोडण्याची गरज नाही, असे ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले.
अतिवृष्टीचे कारण
१४ आणि १५ ऑगस्टनंतर मराठवाड्यातील जिल्ह्यांत सलग पाऊस पडला. याचे कारण म्हणजे बंगालच्या उपसागरात एकामागोमाग एक कमी दाबाची क्षेत्रे तयार झाली. ही क्षेत्रे उत्तर पश्चिम व पश्चिम दिशेला सरकली. याचा परिणाम म्हणून विदर्भासोबत मराठवाड्यात मुसळधार पाऊस पडला.
ढगफुटी म्हणजे काय?
मराठवाड्यात सर्वसाधारण मध्यम पाऊस असतो. मात्र, कमी दाबांच्या क्षेत्रामुळे कमी दिवसांत जास्त पडला. याला ढगफुटी म्हणता येणार नाही. ढगफुटी म्हणजे १ तासांत १०० मिलिमीटर पाऊस पडतो. मराठवाड्यात गेल्या ४५ दिवसांत मोठा पाऊस पडला असून, त्याचा परिणाम म्हणून पूरस्थिती निर्माण झाली आहे.
२७, २८ आणि २९ सप्टेंबर रोजीही बंगालमधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. या पावसाला अतिवृष्टी म्हणता येणार नाही किंवा तसे म्हटलेले नाही, असेही होसाळीकर म्हणाले.
अधिक वाचा: Maharashtra Rain : मान्सून लांबला; राज्यात पुढील तीन दिवस 'या' भागात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता