Join us
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणातून कॅनॉल आणि बोगद्यामार्फत शेतीला पाणी सोडले; किती दिवस सुरु राहणार पाणी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 12:17 IST

ujani dam water for farming उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मुख्य कालव्यातून एक हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

टेंभुर्णी: उजनी धरणातून शेतीसाठी कालवा व बोगदा यातून आवर्तन सुरू झाले असून, मुख्य कालव्यातून एक हजार ५०० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.

भीमा सीना जोड कालव्यातून (बोगद्यातून) आगामी दोन दिवसांत ९५० क्युसेकपर्यंत विसर्ग वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता सुचिता डुंबरे यांनी दिली.

मागील पंधरवड्यात भीमा नदीतपाणी सोडून नदीवरील सर्व सतरा बंधारे भरून घेतले आहेत. तसेच बोगद्यात पाणी सोडून सीना नदीतील बंधारे पण भरून घेतले आहेत.

परंतु, सीनेच्या बंधाऱ्यातील पाणी आता कमी झाले असल्यामुळे यापुढे पुन्हा यामध्ये पाणी अडवण्यासाठी बोगद्यातून पाणी सोडण्यात येत आहे.

कालवा आणि बोगदा या दोन्ही ठिकाणचे आवर्तन यापुढे ४५ ते ४८ दिवस चालू राहणार असून, एप्रिल २६ अखेरपर्यंत पाणी चालू राहील, असे धरण नियंत्रण विभागाकडून कळवण्यात आले आहे.

सीना माढा सिंचन योजनेतून ३१५ क्युसेक विसर्गाने, तर दहिगाव (करमाळा) सिंचन योजनेतून १०० क्युसेक विसर्ग मागील एक महिन्यापासून सुरू आहे.

सर्वत्र उन्हाळ्याची उष्णता वाढत असल्यामुळे उजनी लाभक्षेत्रातील पिकांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. उजनी उजव्या कालव्यावरून १२६ किलोमीटर अंतरापर्यंत लाभक्षेत्राला हे पाणी मिळणार आहे.

तर डाव्या कालव्यावरून १२२ किलोमीटर अंतरातील एकूण ९ लाख ५० हजार एकर लाभक्षेत्राला हे पाणी मिळणार आहे. सीना माढा सिंचन योजनेवरून माढा तालुक्यातील ४० हजार एकर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.

उजनीची सद्य:स्थिती◼️ उजनी जलाशयात सध्या २४.६६ टीएमसी एकूण पाणीसाठा असून, ३१ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.◼️ सोलापूर, पुणे, अहिल्यानगर जिल्ह्यांतील शेतीसाठी अनेक उचल पाणी घेणाऱ्या संस्था तसेच शेतकऱ्यांच्या वैयक्तिक संस्था, वीज निर्मिती केंद्रे, साखर कारखाने, अनेक लहानमोठ्या उद्योगधंद्यासाठी व लहान तसेच मोठ्या पाणीपुरवठा योजनांसाठी जलाशयातील पाण्याचा वापर होत आहे. टक्केवारी ५६.९४ टक्के आहे.

अधिक वाचा: शेतजमिनी अजून महाग होणार; पुढील आर्थिक वर्षांसाठी ग्रामीण भागातही रेडीरेकनर दर वाढणार?

English
हिंदी सारांश
Web Title : Ujani Dam Releases Water for Irrigation; Remaining Water Stock Revealed

Web Summary : Ujani dam released water for irrigation via canals and tunnels. Water release will continue for 45-48 days, benefiting Solapur, Pune, and Ahmednagar districts. The dam currently holds 24.66 TMC total water storage.
टॅग्स :उजनी धरणपाणीशेतकरीशेतीसोलापूरनदीपीकअहिल्यानगरतापमानपुणेधरण