नातेपुते : काही दिवसांपासून धरण आणि त्याच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने ओढ दिल्याने पाण्याची आवक कमी झाली आहे. यामुळे धरणातीलपाणीसाठा ८८.६४ टक्केवर स्थिर झाला आहे.
२० जुलै रोजी सकाळी ८ वा. सांडव्याद्वारे होणारा पाण्याचा प्रवाह पूर्णपणे थांबवण्यात आला आहे. वीर धरण परिसरात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे, धरणात येणाऱ्या पाण्याची आवक लक्षणीयरीत्या घटली आहे.
धरणातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आणि उपलब्ध जलसाठा जपून वापरण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
वीर धरणातील सांडव्याचा विसर्ग थांबवला असला, तरी निरा उजवा कालवा व निरा डावा यातून शेती व पिण्याच्या पाण्यासाठी विसर्ग सुरू आहे.
आजचा पाणीसाठा
भाटघर ८६.९० टक्के
वीर ८८.६४ टक्के
निरा देवघर ६८.६४ टक्के
गुंजवणी.६९.०८ टक्के
निरा खोऱ्यातील चारही धरणातील ८१.८८ टक्के झाला आहे.
नदीकाठच्या रहिवाशांना दिलासा
◼️ पावसाचे प्रमाण घटल्याने आणि धरणातून होणारा विसर्ग थांबल्यामुळे, नदीकाठच्या गावांना पुराचा धोका टळला आहे.
◼️ यामुळे तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी, भविष्यातील पावसाची स्थिती आणि पाणी व्यवस्थापनावर लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे.
◼️ पुढील काळात पावसाची सद्यस्थिती लक्षात घेऊन धरण व्यवस्थापनाबाबत योग्य निर्णय घेतले जातील, असे पाटबंधारे विभागाने स्पष्ट केले आहे.
अधिक वाचा: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, पीक कर्ज मर्यादेमध्ये मोठे बदल; आता मिळणार वाढीव कर्ज?