आठवड्यापासून नाशिक जिल्हावर असलेल्या ढगाळ हवामानाचे रूपांतर मंगळवारी बेमोसमी पावसात झाले. सायंकाळी अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची धावपळ उडाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी उभा गहू आडवा झाला. शेतातील काढलेला तसेच लागवड केलेल्या कांद्यासह फळबागा व द्राक्षाचे मोठे नुकसान झाले आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाला. मंगळवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. तसेच वातावरणात प्रचंड उष्मादेखील होता. सायंकाळी पावणेचार वाजेच्या दरम्यान अचानक मुसळधार पावसाला सुरुवात झाली सुमारे २० ते २५ मिनिटे सुरू असलेल्या या पावसामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले.
येवला तालुक्यातील अनेक भागांत वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे काढणीला आलेला गहू आडवा झाला असून, वाऱ्यामुळे दाणे गळण्याचे प्रमाण वाढले आहे. तालुक्यातील मुख्य पीक असलेल्या कांद्याची काढणी सुरू असतानाच पाऊस झाल्याने साठवणूक केलेला आणि शेतात असलेला कांदा सडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अचानक आलेल्या पावसामुळे उभ्या गव्हाच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. पीक जमिनीला टेकल्याने आता उत्पादनात मोठी घट होईल असे शेतकरी अशोक पवार यांनी दिली. गेल्या दोन-तीन दिवसांत तालुक्यात ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाढला आहे. त्यातच अनेक शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कांदे काढून ठेवलेले असून, मकाच्या बिट्या शेतातच आहे.
नांदगावला जोरदार वृष्टी
• नांदगाव शहर आणि नांदगाव तालुक्यातील मागच्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. मंगळवारी सायंकाळी शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून जाणवत असलेला थंडीचा कडाका नाहीसा झाला आहे.
• मंगळवारी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने हजेरी लावली. नांदगाव शहरासह तालुक्यातील काही गावांमध्ये अचानक आलेल्या अवकाळी पावसाने हजेरी लावली. अवकाळी पावसामुळे नागरिक, दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शेतात उघड्यावर पडलेला कांदा आणि मका झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
• मका, कांदा, हरभरा व भाजीपाला पिकांना नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली. या पावसामुळे वातावरण ढगाळ झाले आहे. तालुक्यातील मांडवड, लक्ष्मीनगर या परिसरातही दुपारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. शेतात काढून ठेवलेली पिके झाकण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली.
