टेंभुर्णी : सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेले उजनी एप्रिलअखेर मृत साठ्यात जाण्याची शक्यता आहे. सध्या उजनी धरणात २४ टक्के पाणी पातळी शिल्लक राहिली आहे.
सोलापूर शहरासाठी उजनीतून भीमा नदीत १० एप्रिलपर्यंत पाणी सोडावे लागणार असून यानंतर उजनी झपाट्याने मायनसकडे वाटचाल करणार आहे.
सध्या उजनी धरणात उपयुक्त १२ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. उजनी मृत साठ्यात गेल्यानंतर सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजना बंद होणार आहेत.
जून महिन्यात खऱ्या अर्थाने उन्हाळी पिके जगविण्यासाठी शेतकऱ्यांना धडपड करावी लागणार आहे. मान्सून पावसावर शेती पिके अवलंबून राहणार आहेत.
गतवर्षी उजनी धरणात वजा ३६.७१ टक्के पाणी पातळी होती. गतवर्षीचा तुलनेत यंदा समाधानकारक स्थिती असली तरी पावसाळा आणखी अडीच महिने शिल्लक असल्याने पिके जगवण्यासाठी कसरत करावी लागणार आहे.
१ जानेवारीपासून गेल्या तीन महिन्यांत ३९ टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. १ जानेवारी रोजी ५१. ९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. उजनी पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर साधारण एप्रिलअखेरपर्यंत उजनी मृत साठ्यात जात असते.
कालवा आणि जोडकालव्यातून विसर्ग सुरूच
१) सध्या उजनी धरणातून उजनी मुख्य कालव्यातून २ हजार ९५० क्युसेक विसर्ग सुरू असून, भीमा सीना जोड काव्यातून ८५० क्युसेक, सीना माढा उपसा सिंचन योजनेतून ३३३ क्युसेक, दहिगाव सिंचन योजनेतून १२० क्युसेक विसर्ग सोडण्यात येत आहे.
२) शेतीसाठी कालव्यातून दुसरे आवर्तन कायम राहणार असून वजा ३० टक्केपर्यंत उजनीतून मुख्य कालव्यात पाणी सोडले जाऊ शकते.
३) सध्या उजनी धरणात एकूण ७६.५७ टीएमसी पाणी साठा शिल्लक असून सायंकाळी ६ वाजता १२.९२ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.
४) दररोज साधारण अर्धा टीएमसी पाणीसाठा कमी होत आहे. उजनीतून भीमा नदीत पाणी सोडल्यास पाच ते सहा टीएमसी पाणी सोडावे लागणार आहे.
अधिक वाचा: भविष्यात कांद्याला चांगला दर पाहिजे असेल तर साठवणुकीपूर्वी व साठवणुकीत करा हे उपाय