सध्या मुसळधार पर्जन्यवृष्टी होत आहे. त्यामुळे तिलारी धरणातील पाणलोट क्षेत्रात झपाट्याने वाढ होऊन तिलारी धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे.
बुधवारी दुपारच्या सुमारास धरणाच्या चारही दरवाजांतून विसर्ग सुरू झाला असल्याचे तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. दोडामार्ग तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे.
परिणामी सर्वत्र पाणीचपाणी झाले आहे. तालुक्यातीलच नव्हे, तर जिल्ह्यातील मुख्य व मोठे असलेल्या तिलारी धरणातील पाणीपातळीत कमालीची वाढ होत आहे.
मुसळधार पावसामुळे धरणाच्या सभोवताली असलेल्या डोंगरातून मोठ्या प्रमाणात पाणी धरणात जमा होते. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार वृष्टीमुळे धरणातील पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.
त्यामुळे हे धरण बुधवारपर्यंत भरून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता तिलारी पाटबंधारे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती. तसा इशाराही नदीकाठच्या गावांना दिला होता.
धरणाने माथा पातळी ओलांडली
मंगळवारी सकाळी ७:४५ वा. च्या सुमारास धरणाची पाणी पातळी १०५,०८ मीटर झाली होती. बुधवारी सकाळी ७:४५ वा. च्या सुमारास १०६,१० मीटर झाली, तर धरणाची सांडवा माथा पातळी १०६.७० मीटर झाल्यास पाण्याचा विसर्ग सुरू होतो. दुपारी २:५० वा. च्या सुमारास या पातळीत वाढ होऊन सांडवा माथा पातळी ओलांडली व धरणाच्या चारही दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला.
जिल्ह्यात पावसाची संततधार
दरम्यान, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी सकाळपासूनच पावसाची अधूनमधून संततधार सुरू होती. त्यामुळे नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. असाच पाऊस सुरू राहिल्यास पूरपरिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे.
नदीपात्रातील पाण्यात कमालीची वाढ
बाहेर पडलेले हे पाणी पुच्छ कालव्याद्वारे तिलारी नदीला येऊन मिळते. शिवाय तेरवण मेढे उन्नैयी बंधाऱ्यातून विसर्ग होणारे पाणी देखील तिलारी नदीपात्रात येऊन मिळत असल्याने तिलारी नदी पात्रातील पाण्यातही कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन तिलारी पाटबंधारे प्रकल्पाचे अधिकाऱ्यांनी केले आहे.
अधिक वाचा: महाबळेश्वरच्या पावसाने दीड हजार मिलिमीटरचा टप्पा ओलांडला; कोयना धरणात झाला किती पाणीसाठा?