परतीच्या पावसाचा फटका सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भातशेतीबरोबरच अनेक व्यवसायांना बसला आहे. यंदा जिल्ह्यात मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला असून, नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी तो मुसळधार कोसळत आहे.
सततच्या सुरू असलेल्या संततधार पावसामुळे दोडामार्ग तालुक्यातील तिलारी धरणाने १०० टक्के पातळी गाठली आहे. धरणाची पातळी ११३.२० मीटर इतकी झाली असून, वाढत्या पाण्याच्या दबावामुळे प्रशासनाने तातडीने धरणाचे दरवाजे उघडले आहेत. सध्या धरणातून १९.९४ घनमीटर प्रति सेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणाच्या विसर्गाबरोबरच तेरवण मेढे येथील उन्नयी बंधाऱ्यातूनही १६.८४ घनमीटर प्रति सेकंद इतक्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या दोन्ही स्रोतांमधून निघणारे पाणी थेट तिलारी नदीला मिळत असल्याने नदीच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.
व्यापारी, विक्रेते चिंतित
अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बाजारपेठांमध्ये ग्राहक फिरकतच नाहीत. याशिवाय आठवडा बाजारांवरही अवकाळी पावसाचे संकट ओढावले आहे. फिरते विक्रेतेही अवकाळी पावसामुळे हतबल झाले आहेत. त्यामुळे ते पाऊस जाण्याची वाट पाहत आहेत.
नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
तिलारी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने प्रशासनाने तिलारी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीकाठच्या भागांपासून सुरक्षित अंतर राखण्याचे आणि अनावश्यकपणे नदी परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
जा... आता बस झाला...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला होता. त्यामुळे दुपारनंतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली. रात्रभर पावसाची संततधार सुरू होती. त्यामुळे अवकाळी पावसाने जिल्ह्यात सध्या धुमाकूळ घातला असून, 'आता बस झाला... पाऊस' असे म्हणण्याची वेळ सिंधुदुर्गवासियांवर आली आहे.
नदी, नाले, ओढ्यांना पूरस्थिती
दोडामार्ग तालुक्यात मागील काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी मुसळधार पाऊस कोसळला आणि सलग दुसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. यामुळे अनेक ठिकाणी नाल्यांना आणि ओढ्यांना पूर आला आहे
