राज्यात ठिकठिकाणी कमाल तापमानाचा पारा ४० अंशांवर पार गेला असतानाच पुढील चार ते पाच दिवस राज्यात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असून, काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे.
तर मुंबईतही ६ आणि ७ मे रोजी पावसाची शक्यता आहे. ५ ते ७ मे दरम्यान नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव अवकाळीच्या तीव्रतेबरोबर गारपिटीची शक्यता आहे.
अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये ६ व ७ मे, मराठवाड्यात ७ मे, विदर्भात ५ मे रोजी अवकाळीबरोबर गारपिटीची शक्यता आहे तर दुसरीकडे कोकण ३४ ते ३५ डिग्री व विदर्भात ४२ ते ४४ डिग्री तापमान नोंदविले जात आहे.
राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला असतानाच, रविवारी वाशिमने सर्वाधिक तापमानाची नोंद केली. वाशिममध्ये कमाल तापमान ४२.८ अंश सेल्सिअस इतके होते. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील मालेगावमध्ये ४२.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
राज्यातील तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उष्णतेच्या झळांनी विविध जिल्ह्यांत नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. घराबाहेर पडताना धडकी भरेल एवढे तापमान राज्यभरात नोंदवले जात आहे. त्यामुळे जनजीवनावर परिणाम दिसून येत आहेत.
अधिक वाचा: एक रुपयात पिक विमा बंद; आता राज्यात अशी राबवली जाणार पिक विमा योजना