मुंबई : उत्तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही ठिकाणी पावसासह गारपिटीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
त्यानुसार बुधवारी पुणे, सातारा, बीड, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यांसह आसपासच्या परिसराला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईसह कोकणात ६ व ७ मे तर मराठवाड्यात ७ व ८ मे रोजी अवकाळीच्या वातावरणाची शक्यता वाढली आहे, असे हवामान विभागाने सांगितले आहे.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात दिनांक ०६ ते ०९ मे या कालावधी दरम्यान ३० ते ४० किमी प्रति ताशी वेगाचा सोसाट्याचा वारा, विजांचा लखलखाट व मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. असे कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील ग्रामीण कृषी मौसम केंद्राने जाहीर केले आहे.
वातावरणाच्या ट्रॉपोस्पीअर या स्तराच्या खालील व वरील पातळीमध्येमध्ये पाकिस्तान व लगतच्या पंजाब व वायव्य राजस्थान वरती पश्चिमी विक्षोभीय (Western Disturbance) वाऱ्यापासून एक चक्रीय अभिसरण निर्माण झालेले आहे.
आग्नेय मध्यप्रदेश पासून ते मराठवाडा, तेलंगाणा व दक्षिण मध्य महाराष्ट्र ओलांडून दक्षिण कर्नाटकच्या अंतर्गत भागापर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा (Rain Trough) निर्माण झालेला आहे.
शेतकऱ्यांना आवाहन
काढणी केलेली भात व भुईमूग पिके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, आंब्याची काढणी ८५ ते २०% पक्वतेला लवकरात लवकर करावी व बागेत पडलेल्या काजू बीयांची वेचणी करून बिया सुरक्षित ठिकाणी वाळवण्यास ठेवाव्यात.
मान्सून कधी येणार?
१३ मे दरम्यान मान्सून दक्षिण अंदमान समुद्र, बंगालच्या उपसागरातील आग्नेय भागात आणि निकोबार बेटांवर पुढे सरकण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी दिली.
अधिक वाचा: या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झाली गारपीट; विटेच्या आकाराच्या पडल्या गारा