विसापूर : श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर धरण ओव्हरफ्लो झाले आहे. गेल्या पंचवीस वर्षात प्रथमच हा जलाशय निव्वळ पावसाच्या पाण्याने ओव्हरफ्लो झाला.
त्यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरणाच्या सांडव्यातून पाणी वाहत आहे. यंदा मे महिन्यात पावसाला सुरुवात झाली.
या धरणावरील हंगा नदी व नाल्यांना पूर आल्याने जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या जलाशयाच्या पाण्याची पातळी ९० टक्के झाली.
मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने दहा टक्के पाण्याची आवक होण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला आहे.
या जलाशयाची सध्याची साठवण क्षमता ९०६ दशलक्ष घनफूट आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी या जलाशयात १३४ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक होता.
हा जलाशय ओव्हरफ्लो झाल्याने विसापूर कालवा लाभक्षेत्रातील बेलवंडी चिंभळा, लोणी व्यंकनाथ, शिरसगाव बोडखा व बाबुर्डी येथील शेतकऱ्यांना पाण्यासाठी नेहमीप्रमाणे संघर्ष करावा लागणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
पाणीसाठवण क्षमता घटली
ब्रिटिशांनी १९२७ साली Visapur Dam विसापूर धरण बांधले. यावेळी धरणाची पाणी साठवण क्षमता १३२२ दशलक्ष घनफूट होती. मात्र, गेल्या १०० वर्षात धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पाणी क्षमता आता आता २०६ दशलक्ष घनफूट झाली आहे.
सांडवा परिसरात झाडेझुडपे वाढली
◼️ विसापूर जलाशयातून सांडव्याद्वारे पाणी वाहू लागल्यावर दरवर्षी पर्यटक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी येतात.
◼️ गेल्या काही वर्षात मात्र धरणाच्या सांडव्याच्या खालच्या व वरच्या बाजूला मोठ्या प्रमाणात झाडेझुडपे वाढलेली आहेत. त्यामुळे पर्यटकांना येथे वावरता येत नाही.
◼️ पर्यटनाच्या दृष्टीने जलसंपदा विभागाने पावसाळ्यापूर्वी येथील झाडेझुडपे काढावीत, अशी मागणी होत आहे.
अधिक वाचा: पशुसंवर्धनचा महत्वाचा निर्णय; राज्यात 'या' ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्याला मिळणार नवीन इमारती