अहिल्यानगर जिल्ह्याच्या कुकडी डावा कालव्याचे आवर्तन तातडीने सोडण्याची मागणी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील युवा मंचाचे तालुकाध्यक्ष दिनेश बाबर व खरेदी-विक्री संघाचे व्हाईस चेअरमन प्रसाद शितोळे यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. देवळाली प्रवरा येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मंत्री विखे यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.
त्यावर मंत्री विखे पाटील म्हणाले, कुकडी डावा कालव्याचे आवर्तन पुढील पाच दिवसांत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. आवर्तन सुटल्यानंतर पारनेर तालुक्यासह श्रीगोंदा व कर्जत येथील शेतकऱ्यांनाही या कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळणार आहे. कालव्याचे आवर्तन सुरू झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी पाण्याचे योग्य नियोजन करून काटेकोर व कार्यक्षम वापर करावा, जेणेकरून अधिकाधिक शेतीला फायदा होईल.
तसेच दिनेश बाबर म्हणाले, कुकडी कालव्याचे आवर्तन सुटल्यानंतर पारनेर तालुक्यातील रेनवडी, पाडळी आळे, म्हस्केवाडी, शिरापूर, वडनेर बुद्रुक, लोणी मावळा या अळकुटी गणातील गावांना थेट लाभ होणार आहे. त्यामुळे कांदा, ऊस, भाजीपाला तसेच रब्बी हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कुकडी कालव्याचे पाणी उपलब्ध झाल्याने दुष्काळी परिस्थितीवर काही प्रमाणात मात होऊन शेती उत्पादनात वाढ होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
