गिरणा धरणाचे पहिले सिंचन आवर्तन १५ डिसेंबरला सुटणार आहे. या सिंचन आवर्तनाचे पाणी २२ डिसेंबरपर्यंत जळगाव जिल्ह्याच्या एरंडोल तालुक्यात पोहोचण्याची शक्यता आहे, अशी माहिती गिरणा पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता कुलदीप पाटील यांनी दिली.
अंजनी धरणाच्या पाण्यासाठी अजून शेतकऱ्यांकडून मागणी अर्ज आलेले नाहीत. मागील पाणीपट्टी व पाणी मागणीचे अर्ज भरावेत, असे कळविण्यात आले आहे. दरम्यान, ऑक्टोबरअखेर अवकाळी पाऊस सुरू असल्यामुळे रब्बीच्या पेरण्या लांबणीवर पडलेल्या आहेत.
खरीप हंगामाची कामे पूर्ण झाल्यानंतर रब्बी पेरण्यांकडे शेतकरी वर्ग सज्ज होण्याची चिन्हे आहेत. यावर्षी अंजनी व गिरणा धरण हे १०० टक्के पाण्याने भरल्याने रब्बीसाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. एका बाजूला अंजनीचे आवर्तन, तर दुसऱ्या बाजूला गिरणेचे आवर्तन असा दुहेरी फायदा सिंचनासाठी होणार आहे.
एकंदरीत रब्बीसाठी गिरणा आणि अंजनी या नद्यांचे पाणी दोन्ही शेतांपर्यंत पोहोचणार आहे. ज्यामुळे खरीपातील झालेले पिकांचे नुकसान काहीअंशी का होईना मात्र रब्बीतील उत्पन्नातून भरून निघण्याची आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.
