यंदा जळगाव जिल्ह्यासह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील जलसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण जलसाठा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत भरला आहे.
यात जळगाव जिल्ह्यातील सुमारे ५० हजार हेक्टर सिंचनासाठी आणि सहा तालुक्यांसाठी पिण्याच्या पाण्यासाठी महत्त्वाचे असलेले गिरणा धरण १०० टक्के भरल्याने नोव्हेंबर महिन्यातही या धरणातून विसर्ग सुरू आहे.
पावसाळ्यानंतर सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत धरणातून होणारा विसर्ग सामान्यपणे बंद केला जातो. मात्र, यंदा गिरणाच्या पाणलोट क्षेत्रात विक्रमी पाऊस झाला. त्यातच विसर्ग थांबवण्याची तयारी सुरू असतानाच राज्यभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली.
यामुळे गिरणा धरणातून विसर्ग कमी न करता पुन्हा वाढवण्यात आला. सध्या नोव्हेंबर महिना अर्धा संपत आला असतानाही गिरणा धरणातून १२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरूच आहे. त्यामुळे गिरणा नदी अजूनही दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र आहे.
सर्वत्र आबादानी
• जिल्ह्यात गिरणेप्रमाणेच हतनुर, वाघूर, अंजनी ही धरणं देखील १०० टक्के भरली आहेत. त्यामुळे गिरणेप्रमाणेच तापी, वाघूर आणि अंजनी या नद्याही हिवाळ्यातसुद्धा वाहत असल्याचे दृश्य सध्या दिसत आहे.
• दरम्यान, अद्याप जिल्हा कालवा समितीची बैठक झाली नसल्याने आवर्तनाबाबत अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही.
रब्बी पिकांना मोठा फायदा
• गिरणा नदीतून नोव्हेंबर महिन्यातही पाणी वाहत असल्याने याचा थेट फायदा रब्बी पिकांना होणार आहे.
• जिल्ह्यात आधीच रब्बीच्या क्षेत्रात ५० हज हेक्टरची वाढ होण्याचा अंदाज आहे.
• सामान्यपणे गिरणा धरणातून नोव्हेंबर ते मे महिन्यादरम्यान सिंचनासाठी पाच आवर्तनं सोडली जातात.
• यातील पहिले आवर्तन रब्बीच्या लागवडीसाठी नोव्हेंबर महिन्यात सोडले जाते.
• यंदा नदीपात्रात अजूनही पाणी वाहत असल्याने नोव्हेंबर महिन्यातील पहिले आवर्तन सोडण्याची गरज नाही, असे चित्र आहे.
