गेल्या सतरा दिवसांपासून सलग पडणाऱ्या पावसाने बुधवारी अठराव्या दिवशी विश्रांती घेतली. अतिवृष्टी, जोरदार पर्जन्यवृष्टी व महापुरामुळे सप्टेंबर महिना स्मरणात राहणार आहे.
या महिन्यात जिल्ह्यात एकूण २६७ मिलिमीटर पाऊस पडला आहे. पूर्वानंतर आलेले उत्तरा नक्षत्रही दमदार बरसत आहे. उत्तरा नक्षत्राला १३ सप्टेंबरला सुरुवात झाली अन् २७ सप्टेंबरला चित्रा नक्षत्र सुरू होत आहे.
८ सप्टेंबरला जिल्ह्यात पाऊस पडू लागला. ८ सप्टेंबरला जिल्ह्यात एकूण ३.५ मिलिमीटर इतका पाऊस पडला. त्यानंतर एक दिवस १.५ व एक दिवस १.९ मिलिमीटर पाऊस पडला. अन्य १५ दिवस दररोज २.८ मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे.
सप्टेंबर महिन्याचा सरासरी पाऊस १७६ मिलिमीटर असताना बुधवार २४ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण २६७ मिलिमीटर पाऊस पडला. सरासरी पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असता १५१ टक्के इतका पाऊस पडला आहे.
हवामान विभागाचा यलो अलर्ट
◼️ हवामान विभागाने गुरुवार २५ सप्टेंबर ते रविवार २८ सप्टेंबर या चार दिवसांना यलो अलर्ट दिला आहे.
◼️ गुरुवार आणि शुक्रवारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असून ३० ते ४० किलोमीटर प्रतिवेगाने वारे वाहणार आहेत.
◼️ शनिवार व रविवारी जिल्ह्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
बार्शी वगळता सगळीकडे कमी
जिल्ह्यात फक्त बार्शी तालुक्यात १० मिलिमीटरच्या वर म्हणजेच १५.६ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. तर इतर तालुक्यात पावसाने माघार घेतली.
बुधवार २४ सप्टेंबर रोजी पडलेला पाऊस
उत्तर सोलापूर - ०.४, दक्षिण सोलापूर - ४.०, बार्शी - १५.६, अक्कलकोट - २.६, मोहोळ - ५.६, माढा - ४.६, करमाळा - ०.२, पंढरपूर - ४.१, सांगोला - १.१, माळशिरस - ०.१, मंगळवेढा - ४.४ मिलिमीटर इतका पाऊस झाला.
अधिक वाचा: उसाची पळवापळवी होऊ नये म्हणून यंदा गळीत हंगाम लवकरच सुरु होणार; उसाला कसा मिळणार दर?