पुणे : राज्यात थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला असून दिवसाही उबदार कपडे घालण्याची वेळ आली आहे. मंगळवारी बहुतांश भागातील किमान तापमानाचा पारा उतरला असून, अहिल्यानगर येथे सर्वाधिक नीचांकी ७. ४ तापमानाची नोंद झाली आहे.
येत्या काही दिवसात तापमान आणखी घटण्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्र गारठला आहे.
विदर्भातील गोंदिया, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्यातील पारा ९ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला आहे. त्यामुळे रस्त्यांवर शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
अनेक जिल्ह्यातील पारा १० अंश सेल्सिअसपर्यंत घसरला आहे. छ. संभाजीनगर, परभणी, धाराशिव मधील किमान तापमानात २ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातही जळगाव, नाशिक आणि पुण्याचे तापमान ८ ते ९ अंशापर्यंत घसरले आहे. राज्याच्या अनेक भागांमध्ये विशेषतः उत्तर-मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा येथे कडाक्याची थंडी पडेल.
पश्चिमी वाऱ्याचा प्रकोप
उत्तर भारतातून एकापाठोपाठ मार्गक्रमण करणाऱ्या पश्चिमी झंजावात प्रकोपामुळे थंड वारे राज्याकडे झेपावत आहेत. यामुळे मुंबईसह कोकणाचा भाग वगळता राज्यात सर्वच शहरे गारठली आहेत, असे हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी सांगितले.
नाशिकचा पारा घसरला
◼️ मागील ४८ तासांत किमान तापमानाचा पारा ३.३ अंशांनी घसरला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ९.३ अंश सेल्सिअस किमान तापमान पेठरोडवर मोजण्यात आले.
◼️ निफाड येथील गहू कृषी संशोधन केंद्रात या हंगामातील सर्वात नीचांकी ५.९ अंश सेल्सिअस तर परभणीतही तेवढेच तापमान नोंदवण्यात आले.
जिल्ह्यातील किमान तापमान (अंश सेल्सिअस)
पुणे - ८.९
अहिल्यानगर - ७.४
जळगाव - ८.४
नाशिक - ९.३
धाराशिव - १२
छ. संभाजीनगर - ११
अमरावती - १०.६
चंद्रपूर - ११.६
गोंदिया - ८.६
नागपूर ८.८
यवतमाळ - ९.२
अधिक वाचा: राज्य शासनाच्या 'या' योजनेतून मिळणार मोफत ड्रोन पायलट प्रशिक्षण; कुठे आणि कसा कराल अर्ज?
