खडकवासला धरणातून पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी मागील आठवड्यापासून रब्बी हंगामातील पहिले आवर्तन सोडण्यास सुरुवात झाली आहे. पुढील ६० दिवसांसाठी हे आवर्तन राहणार असून सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.
सद्यःस्थितीत कालव्यातून एक हजार क्युसेकने पाणी सोडण्यात येत आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली. या आर्वतनाचा फायदा हवेली, इंदापूर, दौंड आणि बारामती तालुक्यातील रबी पिकांसाठी शेतीला फायदा होणार आहे.
यंदा चांगला पाऊस झाल्याने धरणे १०० टक्के भरली आहेत. त्यानंतर परतीचा पाऊस सुद्धा समाधानकारक झाला आहे. ग्रामीण भागातून शेतीसाठी रब्बीतील पिकांसाठी आवर्तन सुरू करण्याची मागणी होत होती.
त्यानुसार पाटबंधारे विभागाकडून ही मागणी मान्य करत मागील आठवड्यापासून कालव्यातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सध्या खडकवासला, टेमघर, वरसगाव, आणि पानशेत असे चार धरणे मिळून एकूण पाणीसाठा २५ टीएमसी म्हणजे ८५ टक्के इतका उपलब्ध आहे.
शेतीला किती पाणी द्यायचे आणि शहराला पिण्यासाठी किती पाणी राखीव ठेवायचे याचा निर्णय कालवा समितीच्या बैठकीत होत असतो. शेती व पिण्याच्या पाण्याचे वर्षभराचे नियोजन कालवा समितीच्या बैठकीत होत असते.
पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कालवा समितीची बैठक होते. या बैठकीस शहरी व ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधी, पालिका व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित असतात.
कालवा समितीची बैठक साधारणपणे नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होते. यंदा मात्र कालवा समितीची बैठक वेळेवर झाली नाही. नोव्हेंबर महिन्यात नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता त्यानंतर डिसेंबर महिन्यात महापालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली.
त्यामुळे कालवा समितीची बैठक लांबणीवर गेली. त्यामुळे यंदा कालवा समितीच्या निर्णयाविनाच आवर्तन देण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाकडून घेण्यात आला, अशी माहिती अधिकृत सूत्रांच्या वतीने देण्यात आली.
हेही वाचा : आता सर्पदंशावर होणार अचूक उपचार; स्नेक वेनम किटमुळे कळणार सर्पदंश विषारी की बिनविषारी
