निळवंडे धरणातूनशेतीसाठीचे सिंचनाचे पहिले उन्हाळी आवर्तन सोमवारी सकाळी सुरू झाले. नदीपात्रातून १ हजार ६०० क्यूसेकने पाणी सोडण्यास सुरुवात झाली.
या वर्षी भंडारदरा आणि निळवंडे ही दोन्ही धरणे पूर्ण भरली. ओव्हरफ्लोद्वारे मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आल्यामुळे जायकवाडी धरणही भरले होते.
सध्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६२ टक्क्यांहून अधिक, तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ४० टक्के आहे. भंडारदरा धरणातून वीजनिर्मितीसाठी ८४५ क्यूसेकने पाणी सोडण्यात येत आहे.
निळवंडे धरणाची पाणी पातळी कमी झालेली असल्यामुळे कोंदणी जलविद्युत प्रकल्पामधूनही वीजनिर्मिती सुरू झाली आहे. यासाठी सकाळी २ हजार ३५७क्यूसेक विसर्ग सुरू होता.
सध्या विजेची मागणी वाढत असल्याने भंडारदरा धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी रंधा येथील उन्नयन बंधाऱ्यात साठविण्यात येत आहे.
पुरेसा पाणीसाठा झाल्यानंतर या बंधाऱ्यातून सकाळ व सायंकाळी कोदनी येथील जलविद्युत प्रकल्पातून वीजनिर्मितीसाठी सोडण्यात येत आहे. पुढे हे पाणी निळवंडे धरणात साठविण्यात येते.
पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणातील पाणीसाठा ६ हजार ९३४ दशलक्ष इतका होता. तर निळवंडे धरणातील पाणीसाठा ३ हजार ३३३ दलघफू इतका होता.
निळवंडे धरणाच्या कालव्यांतून पाणी सोडण्यात येत नसले तरी उच्चस्तरीय कालव्यातून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणावर सुरू होती.
असे असतानाच सोमवारी सकाळी या डाव्या कालव्यातूनही पाणी सोडण्यास सुरुवात झाली. सुरू झालेले हे सिंचनाचे आवर्तन सुमारे २५ ते २८ दिवस सुरू राहणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अभियंता योगेश जोर्वेकर यांनी दिली.
अधिक वाचा: यंदा राज्यातील शेतकऱ्यांना ऊस गाळपातून मिळणाऱ्या रकमेला १५ हजार कोटी रुपयांचा फटका