उत्तर दक्षिण द्रोणिका रेषा उत्तर पूर्व मध्य प्रदेशापासून मन्नाडच्या आखातापर्यंत म्हणजेच विदर्भ, तेलंगणा, अंतर्गत कर्नाटक आणि तामिळनाडू मार्गे जात आहे.
त्यामुळे कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. आज, सोमवारी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीडमध्ये उष्ण व दमट हवामान राहणार आहे.
तर पुढील दोन दिवसांत विदर्भात अकोला, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश भागात वाढत्या उन्हाने जीवाची काहिली केली आहे. गेल्या तीन दिवसांतच पाऱ्याने ४० हून ४५ अंश सेल्सियसपर्यंत मजल मारली आहे.
रविवारपासून तीन दिवसांसाठी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट जारी केला आहे. बीड, लातूर, धाराशिव जिल्ह्यांतील लोकांना घरातून बाहेर पाय काढणे मुश्किल झाले आहे.
त्यामुळे या चार जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, रविवारी (दि. २०) राज्यात चंद्रपूर येथे ४४.६ अंश अशी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली.
मध्य महाराष्ट्रात जळगाव आणि सोलापूरचा अपवाद वगळता पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली आणि सातारा जिल्ह्यांतील कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या खाली घसरला आहे.
मात्र, मराठवाडा आणि विदर्भात कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे आहे, तर विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धाचे तापमान ४४ अंशांच्या घरात आहे.
ही लाट कायम राहण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्रात पुढील दोन दिवसांत कमाल तापमानात वाढ होण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने दिला आहे.
राज्यातील कमाल तापमान पुढीलप्रमाणे
पुणे - ३८.७
जळगाव - ४१
नाशिक - ३७.४
सोलापूर - ४३
औरंगाबाद - ४१.६
परभणी - ४२.४
अकोला - ४४.३
अमरावती - ४४.४
चंद्रपूर - ४४.६
नागपूर - ४४
वर्धा - ४४
बीड - ४२.२
यवतमाळ - ४३.६
अधिक वाचा: Mutkhada : उन्हाळ्यात किडनी स्टोन मुतखड्याचा धोका का वाढतो? जाणून घ्या सविस्तर