Maharashtra Weather Update : राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात घट झाली आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सांगली, नाशिक, जळगाव, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया, भंडार जिल्ह्यात पारा १० च्या आसपास आला आहे.
पुणे, महाबळेश्वर आणि लोणावळ्यापेक्षाही थंड असून पुण्यातील तापमानात हे ९ डिग्री अंश सेल्सिअसवर आले आहे. त्या पाठोपाठ अहिल्यानगर, नाशिकमधील निफाड व जळगाव
या जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरातील तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचे रुपांतर फेंगल या चक्रीवादळात झाले आहे. हे चक्रीवादळ उत्तर-पश्चिमेकडे सरकत असून या वादळाचा प्रभाव प्रामुख्याने तमिळनाडू, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी, केरळ या राज्यांत जाणवणार आहे.
या चक्रीवादळामुळे राज्यावर फारसा काही परिमाण होणार नसला तरी हवेतील आर्द्रता कमी झाली असून कोरड्या हवामान तयार झाले आहे. यामुळे दिवसा व रात्रीच्या तापमानात मोठी घट झाली आहे. पुणे शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात थंडी वाढली आहे. त्यामुळे पहाटे व रात्री तसेच दिवसा देखील गारठा वाढला आहे.
पुण्यात ९.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. तर, महाबळेश्वर येथे १०.५, लोणावळा येथे १७.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात नोंदवले गेलेले तापमान हे आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा जोर वाढला
सध्या उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह वाढला आहे. त्यात फेंगल चक्रीवादळामुळे महाराष्ट्र व मध्य भारतातील हवेतील आर्द्रता कमी होऊन तापमानात आणखी घट होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने रात्री व पहाटेच्या तापमानात मोठी घट होण्याची शक्यता आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता असल्यामुळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामुळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.
* लवकर पेरणी केलेल्या रब्बी ज्वारी पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोएट ५ टक्के ४ ग्रॅम किंवा स्पिनेटोरम ११.७ एससी ४ मिली प्रति १० लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून पावसाची उघडीप बघून फवारणी करावी. फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी.