सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिसऱ्या दिवशीही पावसाचा जोर कायम आहे. वारा आणि मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र कायम आहे. दिवसभर मुसळधार पावसाची संततधार कायम होती.
तर अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जिल्ह्यात आणखी काही दिवस पावसाचा जोर असणार असून २६ मे पर्यंत जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे.
तसेच सांगली जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पाऊस सुरूच आहे. सकाळी काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली होती; पण गुरुवारी दुपारनंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आहे. गुरुवारी सकाळी ८ पर्यंतच्या २४ तासांमध्ये २९.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
गुरुवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या चोवीस तासात ४५.७ च्या सरासरीने ३४६.२ मिलीमीटर पाऊस पडला आहे. दरम्यान रत्नागिरी जिल्ह्यात २२ आणि २३ रोजी हवामान खात्याने 'रेड अलर्ट' तर २४ आणि २५ रोजी 'ऑरेंज अलर्ट' दिला आहे.
तर शुक्रवारी काही भागात मेघगर्जनेसह व वादळी वाऱ्यासह (ताशी ५० ते ६० किमी प्रती तास) मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे. २४ व २५ रोजीही काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हेही वाचा : तुम्ही पित असलेल्या पाण्याचा टीडीएस योग्य नसेल तर उद्भवू शकतो आजार? वाचा सविस्तर