देशात यंदा मान्सूनने नेहमीपेक्षा वेगळा आणि लक्षणीय प्रवास केला असून आज रविवार (दि.१४) सप्टेंबर रोजी त्याने राजस्थानातील वाळवंटी भागातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.
विशेष म्हणजे ही माघार सरासरी तारखेच्या तीन दिवस आधी झाली आहे अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (नि. हवामानशास्त्रज्ञ, IMD पुणे) यांनी दिली आहे.
यावर्षी मान्सूनने २४ मे रोजी केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटकमधून एकाच दिवशी देशात प्रवेश केला होता. त्यानंतर ११३ दिवस देशभर सक्रिय राहून आजपासून त्याने श्रीगंगानगर, बिकानेर, नागौर, जोधपूर, जैसलमेर, फालुदी, बारमेर या राजस्थानातील जिल्ह्यांतून परतीचा प्रवास सुरू केला आहे.
कोणत्या कसोट्यावर मान्सून परतीची घोषणा झाली?
• सलग गेले पाच दिवस त्या भागात हवेच्या शुष्क वातावरणाचे प्राबल्य वाढून पावसाची गतिविधिता थांबली.
• जमिनीपासून साधारण दिड किमी उंचीपर्यन्त हवेचे उच्च दाबाची प्रत्यावर्ती वाऱ्याची स्थिती निर्माण झाली.
• हवेतील पाण्याच्या वाफेचे प्रमाण कमी होवून हवेतील सापेक्ष आर्द्रता टक्केवारी खालावली.
• दिवसाच्या कमाल तापमानात वाढ व रात्रीचे किमान तापमानात घट जाणवू लागली. दरम्यान काल श्री्गंगानगर येथे देशातील सर्वाधिक कमाल तापमान ३८ डिग्री से. ग्रेड होते.
• आकाशातील निरभ्रता वाढली.
दरम्यान काल श्रीगंगानगर येथे ३८ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले, जे देशातील सर्वाधिक होते. हे देखील परतीची लक्षणं स्पष्ट करणारी बाब आहे असं खुळे सांगतात.
महाराष्ट्रात जोरदार पावसाचा अलर्ट
• मान्सून माघारी फिरत असतानाच महाराष्ट्रासाठी येत्या काही दिवसांत पावसाची सणसणीत हजेरी लागणार आहे. आजपासून म्हणजे रविवार (दि.१४) सप्टेंबरपासून पुढील ५ दिवस अर्थात गुरुवार (दि.१८) सप्टेंबरपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवली जात आहे.
• विशेषतः १४ व १५ सप्टेंबर हे दोन दिवस राज्यभरात अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे.
• दरम्यान शेतकऱ्यांसाठी तसेच नद्यांच्या परिसरात राहणाऱ्या नागरिकांसाठी पुढील काही दिवस सावधगिरीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
हेही वाचा : भेसळयुक्त दूध ओळखा घरच्या घरी; 'या' घरगुती चाचण्या करतील दूध भेसळीचा पर्दाफाश