Maharashtra Weather Update : राज्यात गेले दोन ते तीन आठवडे परतीचा पाऊस आणि अवकाळी हवामानामुळे शेतकरी त्रस्त झाले होते. पण आता हवामान बदलाची दिशा थंडीच्या आगमनाकडे वळतेय.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, आज (८ नोव्हेंबर) पासून राज्यात तापमानात लक्षणीय घट होणार असून, कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात थंडीची लाट जाणवेल. रब्बी हंगामासाठी हीच योग्य वेळ शेतकऱ्यांनी तयारी सुरू केली आहे.
पुढील काही दिवसांत महाराष्ट्रात थंडीचा तडाखा बसणार असून, या काळात योग्य पीक व्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळू शकते.
थंडीची चाहूल
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवामानात बदल झाला होता. परंतु, आता हा प्रभाव कमी होत असून, ८ नोव्हेंबरपासून मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, नागपूर, अमरावती, अकोला, नांदेड आणि औरंगाबाद या भागांमध्ये तापमानात ४ ते ५ अंशांनी घट होणार आहे.
पुढील २४ तासांत मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा भागात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र त्यानंतर हवामान कोरडे होईल आणि थंडीची सुरुवात होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
पाऊस ओसरत, हवामान कोरडे होणार
बंगालच्या उपसागरावरील चक्राकार वाऱ्यांची तीव्रता कमी झाल्याने आता पावसाचे प्रमाण घटणार आहे. मुंबईसह कोकण भागात सकाळी गारवा आणि दुपारी सौम्य उष्णता जाणवेल. विदर्भ आणि मराठवाडा विभागात रात्री तापमान झपाट्याने कमी होऊन हलकी थंडी पडण्याची शक्यता आहे.
रब्बी हंगामासाठी अनुकूल परिस्थिती
अवकाळी पावसामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले असले, तरी आता स्थिर हवामानामुळे रब्बी पेरणीसाठी योग्य वेळ निर्माण होत आहे. रब्बी हंगामात गहू, हरभरा, ज्वारी, ओवा, मेथी, कांदा, मटार अशी पिके घेतली जातात. या पिकांना थंड आणि कोरड्या हवामानाची गरज असते. सध्या जमिनीत पुरेसा ओलावा असल्यामुळे बीज उगवणीस पोषक परिस्थिती निर्माण झाली आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* अवकाळी पावसामुळे जमिनीत घट्ट थर बसले असतील तर दोन वेळा नांगरणी करून भुसभुशीत करा. जमिनीत हवा खेळती राहणे अत्यावश्यक आहे.
* सध्या जमिनीत नैसर्गिक ओलावा आहे. त्यामुळे पेरणीपूर्वी किंवा सुरुवातीच्या टप्प्यात अतिरिक्त पाणी देऊ नका. ओलाव्याचं संतुलन राखा.
* अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा अशी अपेक्षा असतानाच आता थंडीची चाहूल आणि कोरडे हवामान हे रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे.
हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : राज्यभरात आज हवामान कसे असेल? जाणून घ्या सविस्तर
