Maharashtra Weather Update : राज्यात मान्सूनचा निरोप जवळ आला असून, एकीकडे 'ऑक्टोबर हिट' म्हणजेच प्रखर उन्हाचा तडाखा जाणवतोय, तर दुसरीकडे पुन्हा एकदा पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. (Maharashtra Weather Update)
त्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावले आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा आणि दुसरीकडे विजांसह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
पण वातावरण अजूनही अस्थिर
राज्याच्या बहुतांश भागातून मान्सून परतला असून, सध्या दिवसभर उकाडा व प्रखर ऊन जाणवत आहे. रत्नागिरीत सर्वाधिक ३५.५ अंश सेल्सिअस तापमान, तर सांताक्रूझ, सोलापूर, जळगाव, ब्रह्मपुरी, अमरावती येथे तापमान ३४ अंशांच्या वर गेले आहे. या उकाड्यामुळे दुपारी बाहेर पडणे नागरिकांसाठी त्रासदायक ठरत आहे.
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम-मध्य अरबी समुद्र आणि नैऋत्य बंगालच्या उपसागरात चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली असून, त्याचा परिणाम म्हणून १९ ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होऊ शकते. यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा वातावरण पावसासाठी पोषक बनले आहे.
'या' जिल्ह्यांना 'यलो अलर्ट'
आज (१५ ऑक्टोबर) कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील २० जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे.
कोकण: रत्नागिरी, सिंधुदुर्ग
मध्य महाराष्ट्र: अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर
मराठवाडा: छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड
विदर्भ: अकोला, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली
तर ठाणे, रायगड, नाशिक, जळगाव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविली आहे.
मराठवाड्यासाठी काय हवामान अंदाज
मराठवाड्यातील संभाजीनगर, बीड, हिंगोली, जालना, लातूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मान्सूनचा निरोप जवळ आला असला तरी महाराष्ट्राचे हवामान अजून स्थिर नाही. राज्यभरात 'ऑक्टोबर हीट' आणि अनियमित पावसाचा संगम दिसून येतोय. त्यामुळे पुढील काही दिवस शेतकरी आणि नागरिकांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* सध्या दिवसाच्या वेळेत प्रखर ऊन आणि रात्री थंड हवा जाणवते आहे.
* या बदलत्या हवामानामुळे शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होऊ नये म्हणून सावधगिरी बाळगावी, अशी सूचना हवामान खात्याने केली आहे.
* विशेषत: सोयाबीन, तूर आणि कापूस पिकांच्या काढणीदरम्यान पावसाचा फटका बसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी पीक सुरक्षित ठिकाणी साठवावे आणि विजांच्या गडगडाटाच्या वेळी शेतीकामे टाळावीत.