Maharashtra Weather Update : नोव्हेंबरचा पहिला दिवस असूनही राज्यात अजूनही पावसाचं सत्र कायम आहे. साधारणपणे या काळात हिवाळ्याची चाहूल लागते, मात्र यंदा राज्यात हवामानाचे चित्र पूर्णपणे उलट दिसत आहे. (Maharashtra Weather Update)
मे महिन्यापासून सुरू झालेला पावसाचा खेळ अजूनही थांबलेला नाही. नोव्हेंबरचा आरंभी सरींचा जोर कायम असून, कोकण किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत अनेक भागांत आजही पाऊस पडत आहे. (Maharashtra Weather Update)
मुंबईत हलक्या सरी कायम
मुंबईत आज सकाळपासूनच हलक्या सरी बरसात आहेत. आकाश ढगाळ असून हवेत आर्द्रता वाढल्याने वातावरण दमट झाले आहे. दुपारपर्यंत काही ठिकाणी मध्यम पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. नागरिकांनी बाहेर पडताना छत्री जवळ ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ठाणे-नवी मुंबईत ढगाळ वातावरण
ठाणे आणि नवी मुंबई परिसरातही कालपासून ढगाळ वातावरण कायम आहे. अधूनमधून रिमझिम ते मध्यम पावसाच्या सरी येत असून दुपारच्या सुमारास काही ठिकाणी जोरदार सरींचा अंदाज वर्तविला आहे. पावसामुळे काही भागात वाहतुकीत अडथळे निर्माण झाले असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पालघर जिल्ह्यात रिमझिम ते मध्यम पाऊस
पालघर जिल्ह्यात आज रिमझिम ते मध्यम पावसाचं वातावरण दिसत आहे. काही ठिकाणी सकाळच्या वेळेतच जोरदार सरी कोसळल्या. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग वाढल्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला हवामान खात्याने दिला आहे.
कोकण किनारपट्टीवर विजांचा कडकडाट
रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही पावसाचे वातावरण कायम आहे. रायगडमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात रिमझिम सरी पडत आहेत. काही किनारी भागात विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह पावसाच्या सरी येण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
विभागनिहाय हवामान अंदाज
कोकण विभाग : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत आज हलक्या पावसाचा अंदाज वर्तविला आहे. काही ठिकाणी अधूनमधून मध्यम सरी पडू शकतात.
मध्य महाराष्ट्र : धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतही हलक्या सरींचा अंदाज आहे.
मराठवाडा विभाग : छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, नांदेड, लातूर, हिंगोली आणि धाराशिव या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
नोव्हेंबरच्या सुरुवातीला पावसाची साथ कायम
IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, आज (१ नोव्हेंबर) रोजी राज्यभर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम पावसाच्या सरींची शक्यता आहे. ३१ ऑक्टोबरच्या तुलनेत पावसाचा प्रभाव किंचित कमी होईल, मात्र हवामानात गारवा आणि दमटपणा कायम राहील.
नागरिकांसाठी इशारा
किनारपट्टी भागातील मच्छीमारांनी पुढील २४ तास समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे.
मुंबई, ठाणे, रायगड भागात वाहतुकीदरम्यान सावधगिरी बाळगावी.
रात्री वादळी वाऱ्यांसह सरींची शक्यता असल्याने नागरिकांनी बाहेर जाणं टाळावं.
एकंदरीत पाहता नोव्हेंबरच्या प्रारंभीही महाराष्ट्रात पावसाचे सत्र सुरूच आहे. हिवाळ्याची चाहूल अद्याप दूर असून, राज्यभरात ढगाळ वातावरण आणि सरींची साथ काही दिवस टिकून राहण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* सध्या अनेक जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस सुरू असल्याने काढणीस आलेल्या सोयाबीन, उडीद, तूर आणि कपाशी पिकांचे संरक्षण करावे.
* पिकं उघड्यावर ठेवू नयेत; शक्य असल्यास गोदामात किंवा झाकून ठेवावीत.
